नागपूर - वनराई लावणार ३० हजार वृक्ष
By Admin | Updated: June 29, 2016 19:18 IST2016-06-29T19:18:50+5:302016-06-29T19:18:50+5:30
वनराई फाऊंडेशन, अॅम्रोसिया फार्म व्हिला प्रकल्प आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर - चंद्रपूर मार्गावर ३० हजार वृक्ष लावण्यात येणार आहे

नागपूर - वनराई लावणार ३० हजार वृक्ष
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २९ : वनराई फाऊंडेशन, अॅम्रोसिया फार्म व्हिला प्रकल्प आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर - चंद्रपूर मार्गावर ३० हजार वृक्ष लावण्यात येणार आहे. राज्य शासनाने १ जुलै रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला असून तो स्वागतार्ह आहे. वनराई फाऊंडेशनने सातत्याने अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून नागपूर आणि परिसर हिरवा केला आहे. याच शृंखलेत ३० हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वृक्षारोपणाच्या क्षेत्रात वनराईने केलेले कार्य सर्वज्ञात आहे. वनराईने केलेल्या कामाची दखल राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. शासनानेही १ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने वनराईच्यावतीने नरखेड तालुक्यातील बरडपवनी येथे वनविभाग आणि कृषी विकास प्रतिष्ठानच्या व ग्राम पंचायतीच्या सहकार्याने सकाळी ९ वाजता आ. आशिष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याच दिवशी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या सहकार्याने तसेच नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.