नायब तहसीलदारासह तलाठ्याला अटक
By Admin | Updated: December 8, 2015 01:27 IST2015-12-08T01:27:14+5:302015-12-08T01:27:14+5:30
कल्याणातील एका मटेरियल सप्लायर्सकडून २५ हजारांची लाच घेताना, कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अभिजित देशमुख यांच्यासह तलाठी जे.बी

नायब तहसीलदारासह तलाठ्याला अटक
बिर्लागेट : कल्याणातील एका मटेरियल सप्लायर्सकडून २५ हजारांची लाच घेताना, कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अभिजित देशमुख यांच्यासह तलाठी जे.बी. सूर्यवंशी याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच पकडले. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत तब्बल १५ कर्मचारी जाळ्यात सापडल्याने, कल्याण तहसील कार्यालय हे ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक भ्रष्ट कार्यालय ठरले आहे.
रामबाग कल्याण येथे राहणारे तुषार पाटील यांचा रेती, विटा, खडी, डब्बर आदी बिल्डिंग सप्लायर्सचा व्यवसाय आहे. या व्यवसायाची रॉयल्टी मिळविण्यासाठी तुषार पाटील यांनी कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी नायब तहसीलदार देशमुखने तलाठी जनार्दन सूर्यवंशी यांच्यामार्फत ३० हजारांची मागणी केली. यामध्ये तडजोड होऊन २५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. ते स्वीकारताना देशमुख याला रंगेहाथ पकडण्यात आले. तलाठी जनार्दन सूर्यवंशी यालाही पकडण्यात आले आहे. या अगोदर तहसीलदार किरण सुरवसे यांच्याच कार्यालयातील मंडळ अधिकारी उज्ज्वल देशमुख व तलाठी सुनील पडवळलाही सप्टेंबरमध्ये पकडण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांत सुमारे १५ कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले होते. सातबारा नोंदी, फेरफार, रॉयल्टी, विविध दाखले, केसेस या प्रकरणात एजंटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पैशांशिवाय कामच होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तहसीलदार किरण सुरवसे यांचे नियंत्रण नसल्यामुळेच असे प्रकार वाढल्याचे लोकांचे म्हणणे आहे.