Sanjay Shirsat : काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ शेअर करुन आरोप केले होते. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांची बेडरूम दिसत असून, त्याठिकाणी एक मोठी बॅग ठेवलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही बॅग पैशांनी भरलेली आहे. या व्हिडीओमुळे शिसराट पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या व्हिडीओवर त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. दरम्यान, आता त्यांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार असल्याचे सांगत खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, 'मॉर्फ केलेला माझ्या बेडरुमचा व्हिडीओ आहे. माझं चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न आहे. मी अब्रुनुकसानीची नोटीस काढणार आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. त्यांनी जर माफी मागितली नाही कर मी कारवाई करणार आहे, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
"स्वप्ना पाटकर यांच्याबाबतीत काय काय वक्तव्य केले आहे. ते पाहिले तर यांची लायकी काय आहे हे लक्षात येईल, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.
व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये मंत्री संजय शिरसाट असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या व्हिडीओवरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. मात्र आता संजय शिरसाट यांनी ती बॅग कपड्यांची होती असं स्पष्टीकरण दिलं आहे. मला या व्हिडिओ बद्दल काही आश्चर्य वाटत नाही, जाणून बुजून मला टार्गेट केलं जात आहे, असंही शिरसाट यांनी म्हटलं.
"व्हिडिओमध्ये माझं घर आहे. बेडरूममध्ये मी बनियन वर बसलेलो आहे आणि एक बॅग तिथे ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठून तरी प्रवासातून आलो आहे. अरे मूर्खांनो एवढी मोठी पैशांची बॅग जर ठेवायची असती तर कपाटं काय मेली आहेत का? नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात ठेवली असती ना. परंतु यांना कपड्याची बॅगसुद्धा नोटांची बॅग दिसत आहे. यांना पैशांशिवाय दुसरं काही दिसत नाही," असं संजय शिरसाट म्हणाले.