माझी एसटी, मी एसटीचा - एसटीप्रेमी छायाचित्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:13 AM2019-11-08T00:13:52+5:302019-11-08T00:14:18+5:30

एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रवासाचं एक साधन असेल,

My ST, I'm ST - ST bus lover Photographer | माझी एसटी, मी एसटीचा - एसटीप्रेमी छायाचित्रकार

माझी एसटी, मी एसटीचा - एसटीप्रेमी छायाचित्रकार

googlenewsNext

तो तिची एक अदा आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी वेडा होतो. तिच्या सौंदर्याचा, तिच्या रुबाबाचा फोटो टिपण्यासाठी वाट्टेल ते करायला तो तयार असतो. असा तो म्हणजे जेमतेम २२ वर्षांचा भिवंडी येथील तरुण छायाचित्रकार अनिकेत पाटील आणि जिच्या छायाचित्रासाठी अनिकेतचे देहभान हरपून जाते, ती दुसरीतिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लोकवाहिनी... एसटी.

एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रवासाचं एक साधन असेल, पण अनिकेतसाठी हे त्याचं प्रेम आहे आणि याच प्रेमातून एसटीचे वेगवेगळ्या रूपातले फोटो काढण्याचा त्याला जणू छंदच जडलेला आहे. अनिकेतला एसटीची आवड तशी लहानपणापासूनच होती, पण जसजसा तो मोठा होत गेला तसतसा एसटीचा प्रवास उलगडत गेला. एसटीला प्रवासात होणाºया वेदना त्याला जाणवू लागल्या. महाराष्ट्र राज्याच्या कर्तृत्वात असणारे एसटीचे योगदान याची त्याला जाणीव झाल्यावर, एसटीसाठी काहीतरी करावं, असे मनोमन ठरवले. एसटीची असंख्य छायाचित्रे काढावीत व एसटीची जनमानसात प्रतिमा एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवावी म्हणून अनिकेतने एसटीचे फोटो काढण्याचा छंद जोपासण्याचे ठरवले.
छायाचित्रकार इतर अनेक विषय, जसे प्राण्यांचे, पक्ष्यांचे फोटो काढतात. कुणी निसर्गाच्या वेगवेगळ्या छटांची फोटोग्राफी करण्यात रुची घेतात. तर काहींना माणसांच्या भावविश्वात फोटोग्राफी करण्यात रस असतो. पण, एसटीचे फोटो काढण्यात रुची दाखवणारा अनिकेत हा आगळावेगळा छायाचित्रकार असावा.
महाराष्ट्रात अशी एकही वाट नसेल जिथे एसटीचा थाट नाही. महाराष्ट्राच्या कोणत्याही वळणावर तुम्हाला एसटीचा दिमाखदार वावर हमखास दिसणारच. अनिकेत भिवंडीचा असल्याने कसारा घाटात त्याने एसटीचे असंख्य फोटो काढलेले आहेत. त्याला कधीही फावला वेळ मिळाला की, तो आणि त्याचा कॅमेरा कसारा घाटाच्या वाटेवर तंबू ठोकूनच असतात. असाच अनिकेतने काढलेला कसारा घाटातील मैत्रिणी असलेल्या दोन एसटींचा फोटो. प्रवासात या दोन मैत्रिणींचं टायमिंग साधारण एकच असल्याने कसारा घाटात कधी ती पुढे तर कधी ओव्हरटेक करून दुसरी पुढे जात असते. वसई-जळगाव आणि अर्नाळा-चोपडा या त्या दोघी मैत्रिणी. या दोन्ही खान्देशी जाणाºया मैत्रिणी एका विशिष्ट क्षणी जेव्हा अगदी खेटून चालतील व या दोघी मैत्रिणी अगदी गप्पा मारत चालल्या आहेत, असा क्षणभर भास होईल, अशा क्षणाचा फोटो या दोन गाड्यांचा पाठलाग करत अनिकेतने काढला आहे. तो फोटो केवळ अप्रतिम आहे.

अनिकेतला घाटातील एसटीचे फोटो काढण्यात खूप रुची आहे. उंचउंच डोंगररांगा, रस्त्याच्या कडेने असलेल्या दºया व त्या डोंगरदऱ्यांतून अवघड वळणदार वाटेवरच्या एसटीचे छायाचित्र काढणे हा अनिकेतचा छंद. स्वर्गाची सुंदरता लाभलेला माळशेज घाट. भल्याभल्यांना धडकी भरावी, अशा माळशेज घाटात एसटीचा रुबाब मात्र काही औरच असतो. निसर्गाच्या कुशीतील अवघड वाटेवरचा हा महाराष्ट्राच्या राणीचा थाट टिपण्यात सुख असते. खूप सुंदर अशी एसटीची छायाचित्रे अनिकेतने माळशेज घाटात जाऊन टिपली आहेत. पुणे द्रुतगती मार्गावर अनेक वाहने सुसाट धावत असतात, पण लक्ष वेधून घेते ती मात्र एसटी. भूम- बोरिवली गाडीचं असंच या द्रुतगती मार्गावर काढलेले छायाचित्र अप्रतिम आहे.

गौरी-गणपतीच्या सणाला कोकणच्या रस्त्यावर झालेल्या लांबचलांब एसटीच्या रांगांचं छायचित्र वा मुंबई सेंट्रल येथे जमलेल्या एसटीचे उंचावरून घेतलेल्या छायाचित्रात एसटीचा रुबाब दिसतो. अनिकेत लहानपणापासून जपत असलेला एसटीप्रेमाचा छंद छायाचित्राच्या माध्यमातून जपतो आहे. एसटीचं हे विश्व जगापुढे मांडताना मिळणारे सुख मला इतर कुठल्याही गोष्टीत मिळत नाही. एसटीच्या सुंदर अशा विविध रूपांची जाणीव समाजाला आपल्या फोटोग्राफीद्वारे व्हावी, असं वाटले आणि हा छंद जडत गेला, असं तो म्हणतो.
आपले वेगळेपण जपणारे अनेक छायाचित्रकार महाराष्ट्रभर आहेत, मन थक्क करणारी छायाचित्रे तेही काढतात, पण आपल्या एसटीच्या सौंदर्याचा साज टिपण्यासाठी कोणी आजपर्यंत पुढे आलेलं दिसलं नाही. पण अनिकेतने मात्र महाराष्ट्राच्या मातीतील एसटीचं सौंदर्य लोकांच्या नजरेसमोर आणण्यासाठी फोटोग्राफी हे क्षेत्र निवडलं. अनिकेतने एसटीची अनेक भन्नाट छायाचित्रे आजवर काढलेली आहेत. अनिकेत हा उच्चशिक्षित तरुण असून त्याने केमिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. एसटीच्या फोटोग्राफीसाठी तो वेड्यासारखा भटकंती करत असतो. अनिकेत एक चांगला लेखक असल्याने प्रत्येक फोटोबाबतीत आलेले अनुभव त्याने तितक्याच उत्तमरीत्या शब्दबद्ध केलेले आहेत. अशा या तरुण आणि भन्नाट एसटीप्रेमी असलेल्या छायाचित्रकाराला एसटी कर्मचाºयांचा सलाम.


छायाचित्रकार म्हटले की, प्रत्येकाचं काही वैशिष्ट्य असतं. त्यात कोणी निसर्ग तर कोणी मानवी भावभावनांमधील क्षणचित्रे टिपतात. मात्र, भिवंडीकर तरुण अनिकेत पाटील याला महाराष्टÑाची लोकवाहिनी असलेल्या, गावाखेड्यांतील रस्त्यावर हमखास दिसणाºया एसटीचे फोटो काढण्याचा छंद आहे. एसटी हीच अनिकेतची छायाचित्र क्षेत्रातील पहिली पसंती आहे. एसटीची असंख्य छायाचित्रे काढावीत व तिची जनमानसातली प्रतिमा एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवावी, या हेतूने त्याने एसटीचे फोटो काढण्यास सुरुवात केली. अनिकेतचं एसटीशी मनानं जोडलेलं प्रेमाचं नातं आहे, हे त्याच्याशी बोलताना जाणवतं. उच्चशिक्षित असलेला अनिकेत आजही फावला वेळ मिळाला की, कॅमेरा घेऊन एसटीच्या वाटेवर पोहोचतो. अनिकेतने काढलेलं एसटीचं प्रत्येक छायाचित्र हे महाराष्टÑाची माती, निसर्ग आणि एसटी यांचं नातं सांगणार आहे.

Web Title: My ST, I'm ST - ST bus lover Photographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.