माझी उमेदवारी दक्षिणेतच
By Admin | Updated: September 18, 2014 23:23 IST2014-09-18T22:27:00+5:302014-09-18T23:23:43+5:30
पृथ्वीराज चव्हाण : केंद्रीय निवड समितीकडून दोन दिवसांत निर्णय अपेक्षित

माझी उमेदवारी दक्षिणेतच
कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली आहे़ दोन दिवसांत केंद्रीय निवड समिती त्याबद्दल निर्णय घेईल, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली उमेदवारी दक्षिणेतच असेल, असे संकेत दिले़
येथील सिद्धार्थ मंगल कार्यालयात मलकापूर व वारुंजी जिल्हा परिषद मतदारसंघातील बुथ अॅम्बॅसिडर कार्यकर्त्यांचा मेळावा झाला़
त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, हिंदुराव पाटील आदींंची प्रमुख उपस्थिती होती़
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘खरंतर निवडणुकीत विकासाच्या मूलभूत विषयांवर चर्चा झाली पाहिजे़ लोकसभा निवडणुकीत मात्र ती चर्चा झाल्याचे दिसले नाही़ त्याची जाणीव आम्हाला झाली असून, विधानसभा निवडणुकीत आम्ही ती चूक करणार नाही़
लोकशाहीत विकासकामांना महत्त्व असते़ त्यामुळे कोणी किती विकास केला, कोणी काम केले़ भविष्यात कोण विकास करू शकतो, हे जनतेला ज्ञात आहे़ त्यामुळे थापा मारणाऱ्यांना जनता थारा देणार नाही, उलट विकास करणाऱ्यांच्या पाठीशीच जनता उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़
‘गुजरात मॉडेल’चा कोणी कितीही डंका वाजवत असले तरी महाराष्ट्रच देशात नंबर वन आहे़ अन् ते पहिल्या नंबरवर नेण्यासाठी साऱ्या जनतेचे योगदान आहे़,’ असेही चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)
पी़ डी़ पाटील यांना अभिवादन
बुधवारी दिवंगत पी़ डी़ पाटील यांची पुण्यतिथी झाली़ मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बुधवारी कऱ्हाडात नव्हते़ आज, गुरुवारी कऱ्हाडात पोहोचल्यानंतर त्यांनी दिवंगत पी़ डी़ पाटील यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले़ यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, जयंत काका पाटील आदी उपस्थित होते़