बीडमध्ये मुस्लिम कुटुंब करतंय गायींचे रक्षण

By Admin | Updated: February 1, 2015 13:37 IST2015-02-01T13:34:44+5:302015-02-01T13:37:37+5:30

बीडमध्ये राहणारे शब्बीर सय्यद यांच्याकडे तब्बल १६५ गाय व वासरु असून त्यांची सय्यद आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेताना दिसतात.

A Muslim family in Beed is protecting cows | बीडमध्ये मुस्लिम कुटुंब करतंय गायींचे रक्षण

बीडमध्ये मुस्लिम कुटुंब करतंय गायींचे रक्षण

 ऑनलाइन लोकमत 

बीड, दि. १ - दुष्काळाचे चटके सोसणा-या बीड जिल्ह्यात गायींचे रक्षण करण्यासाठी एका मुस्लिम कुटुंबाने पुढाकार घेतला आहे. बीडमध्ये राहणारे शब्बीर सय्यद यांच्याकडे तब्बल १६५ गाय व वासरु असून सय्यद आपल्या मुलांप्रमाणे या गायींची काळजी घेत आहेत.

बीडमधील दहीवंडी गावात ५५ वर्षीय सय्यद शब्बीर आणि त्यांचे कुटुंब राहतात. शब्बीर यांच्या कुटुंबात एकूण सहा जण आहेत. विशेष म्हणजे शब्बीर हे मुळचे खाटीक समाजाचे. त्यांचे वडिल बुदन सय्यद यांनी १९७० च्या सुमारास कसाई म्हणून काम करण्याऐवजी गायींचे रक्षण करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला त्यांनी दोन गायींना कत्तलखान्यातून सोडवून घरी आणले व त्यांची देखभाल करायला सुरुवात केली. दहीवंडीतील या मुस्लिम कुटुंबाची चर्चा अन्य गावांमध्येही सुरु झाली आणि आज शब्बीर कुटुंबाकडे तब्बल १६५ गाय आणि वासरु आहेत. हे कुटुंब ना दुधाचा व्यवसाय करतो ना मांसाची विक्री. शब्बीर अत्यंत स्वस्त दरात स्थानिक शेतक-यांना गाय व बैल विकतात. या व्यवहारात शेतक-यांना शब्बीर यांच्याकडे लेखी हमीपत्र द्यावे लागते. शेतक-याने गायीला कसायाकडे विकायचे नाही आणि गाय -बैल म्हातारे झाल्यावर त्यांना पुन्हा शब्बीर यांच्याकडे आणून सोडायचे ही शब्बीर सय्यद यांची प्रमुख अट असते. या एकाच अटीवर गाय - बैलांची विक्री केली जाते. या माध्यमातून शब्बीर सय्यद व त्यांचे कुटुंब वर्षाकाठी ७० हजार रुपये कमवतात. सहा जणांच्या कुटुंबासाठी हे उत्पन्न कमीच म्हणावे लागेल. पण गावातील अन्य ग्रामस्थांचे दिवसाला १९ रुपये ऐवढेच उत्पन्न आहे. त्यातुलनेत आमची परिस्थिती चांगली असल्याचे शब्बीर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. गाय व तिच्या वासरुचा मृत्यू झाला तर आमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्ती गेल्यासारखे वाटते असे शब्बीर नमुद करतात.  विशेष म्हणजे या कुटुंबाने मांस सेवन करणार नाही अशी शपथ घेत समाजासमोर एक नवा आदर्शच निर्माण केला आहे. 

 

Web Title: A Muslim family in Beed is protecting cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.