अंधत्वावर मात करत झाला संगीत विशारद
By Admin | Updated: May 17, 2016 01:36 IST2016-05-17T01:36:37+5:302016-05-17T01:36:37+5:30
जीवनातील वैगुण्यावर मात करत, त्यातून हार्मोनियम वादनाची कला अवगत करण्याची जिद्द येथील तरुणाने दाखविली आहे.

अंधत्वावर मात करत झाला संगीत विशारद
पिंपरी : जीवनातील वैगुण्यावर मात करत, त्यातून हार्मोनियम वादनाची कला अवगत करण्याची जिद्द येथील तरुणाने दाखविली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद परीक्षेत किरण गिरमे या अंध तरुणाने प्रथम श्रेणी मिळविली. त्यामुळे अंधारातील आयुष्याला उदरनिर्वाहाचा किरण मिळाला आहे.
महापालिकेच्या संगीत अकादमीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कुटुंबीयांचे प्रोत्साहन व मेहनत यांमुळेच यश संपादन करता आले, असे किरणचे म्हणणे आहे. अजमेरा कॉलनीतील रहिवासी असलेल्या किरण यांना वयाच्या १६ व्या वर्षांपर्यंत सूर्यप्रकाशात दिसू शकेल, इतकी दृष्टी होती. त्यानंतर हळूहळू दृष्टी अधू होत गेली व कायमस्वरूपी अंधत्व प्राप्त झाले. इंदिरा गांधी विद्यालयात जेमतेम दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अंधत्वामुळे पुढील शिक्षणास प्रवेश मिळण्यासाठी अडचणी आल्या.
रेडिओ ऐकण्याच्या सवयीमुळे त्याला संगीताची आवड निर्माण झाली. आवड व उदरनिर्वाहासाठी हार्मोनियम शिकण्याचा निर्णय घेतला. राजीव तांबे या शिक्षकाने स्वत: घरी येऊन शिकवणी घेतली. विशिष्ट भाषा, खाणाखुणांतून शिक्षण सुरू ठेवले. कॉम्प्युटर, मोबाइल सारख्या उपकरणांचा वापर करत शिक्षण सोपे करण्याचा प्रयत्न केला. आई व पत्नी यांनी वाचन व रेकॉर्डिंगमध्ये मदत केली.
अभ्यासक्रम सॉफ्टवेअरमधून रेकॉर्ड करून सराव केला. प्राथमिक चार परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर २०११मध्ये संगीत अकादमीत प्रवेश घेतला. तिथे उमेश पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. आता अंधत्वाची भिती न वाटता मी माझा उदरनिर्वाह करीत आहे. मी स्वावलंबी झालो आहे, असे किरणने अभिमानाने सांगितले. (प्रतिनिधी)