लहानग्या कर्करुग्णांसाठी आता ‘म्युझिक थेरपी’
By Admin | Updated: June 9, 2017 02:23 IST2017-06-09T02:23:12+5:302017-06-09T02:23:12+5:30
कर्करोगग्रस्त लहान मुलांची काळजी घेणारी संस्था सेंट ज्यूड्स चाइल्ड केअर सेंटर आपल्या म्युझिक थेरपी प्रयत्नांना अधिक चालना देणार आहे

लहानग्या कर्करुग्णांसाठी आता ‘म्युझिक थेरपी’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्करोगग्रस्त लहान मुलांची काळजी घेणारी संस्था सेंट ज्यूड्स चाइल्ड केअर सेंटर आपल्या म्युझिक थेरपी प्रयत्नांना अधिक चालना देणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेट लीसह सामाजिक संस्थांसोबत जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यापूर्वी २०११ सालीदेखील ब्रेट लीने ‘म्युझिक’ या आपल्या संस्थेमार्फत एका क्लिनिकल म्युझिक थेरपी प्रोग्रामला मदत केली होती. जवळपास १८ महिने चाललेल्या या उपक्रमात अनेक प्रमाणित आॅस्ट्रेलियन क्लिनिकल म्युझिक थेरेपीस्ट्सनी लहानग्यांना वेदना व्यवस्थापनात मनोधैर्य वाढविण्यात आणि औषधांबरोबरीनेच पूरक उपचार प्रदान करण्यात मदत केली. या वेळी पुन्हा एकदा ब्रेट ली या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. कर्करोगग्रस्त मुलांच्या मदतीसाठी म्युझिक थेरपीच्या लाभांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तो सहकार्य करणार आहे.
म्युझिक थेरपी अर्थात संगीताच्या माध्यमातून उपचार पद्धती, त्यातील प्रक्रिया तसेच त्याचे सिद्ध झालेले वैद्यकीय लाभ यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ब्रेट ली मोठ्या प्रमाणावर सहभागी होईल. याविषयी ब्रेट लीने सांगितले की, माझ्या जडणघडणीत संगीताची खूप मोलाची भूमिका राहिली आहे. आज मी जो कोणी आहे त्यात संगीताचा खूप मोठा वाटा आहे. संगीतामुळे जीवनात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात. या माझ्या विश्वासाला पुष्टी देणारे बरेच संशोधनदेखील करण्यात आले आहे. संगीताच्या माध्यमातून उपचारांचे सकारात्मक परिणाम लोकांपर्यंत पोहोचवू शकेन याची खात्री आहे.
सेंट ज्यूड्स कॉटनग्रीन कॅम्पसमधील क्लिनिकल म्युझिक थेरपिस्ट आस्था लुथ्रा यांनी सांगितले की, संगीतोपचार हे अतिशय मुलायमपणे पण प्रभावीपणे कार्य करतात. कर्करोगांवरील उपचारांमध्ये म्युझिक थेरपी खूप मोलाची भूमिका बजावते. उपचारकाळात शरीरात व मनामध्ये होणारे चढ-उतार सहन करण्याची ताकद या थेरपीमुळे मिळते. या कठीण काळात ही मुले संगीताच्या साथीने अधिक आनंदात राहू शकतात, स्वत:च्या भावभावनांवर नियंत्रण ठेवू शकतात. या उपचारांमुळे लोकांचे आपआपसातले संबंध सुधारतात, विविध उपचारांना सकारात्मक भावनेने सामोरे जाता येते.