संगीत वस्त्रहरण--सरकारनामा

By Admin | Updated: October 9, 2014 23:05 IST2014-10-09T22:05:54+5:302014-10-09T23:05:40+5:30

नाट्यपंढरी सांगलीत ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकाचा प्रयोग रंगलाय.

Music Clothing - Government Letters | संगीत वस्त्रहरण--सरकारनामा

संगीत वस्त्रहरण--सरकारनामा


नाट्यपंढरी सांगलीत ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकाचा प्रयोग रंगलाय. सगळं नाट्यगृह अत्तराच्या घमघमाटानं प्रफुल्लित झालंय. संगीत नाटक असल्यानं नाट्यपदांची रेलचेल दिसतेय. गुणी नटमंडळींमुळं प्रयोग लांबलाय. मात्र तमाम सांगलीकर रसिक खूश आहेत. चार-पाच नाटकमंडळींनी एकत्र येऊन रचलेल्या या नाटकाचा आता पुन्हा पाच वर्षांनीच प्रयोग होणार असल्यानं नाट्यपदांना ‘वन्समोअर’ मिळताहेत.
संजयकाकांच्या नाटकमंडळीनं नांदी सादर केली. जितेंद्र अभिषेकीबुवांनी जशी ‘मत्स्यगंधा’ची पदं बांधली, तशी काकांनीही ताकदीनं ही पदं बांधलीत. भगव्या-हिरव्या भरजरी पोषाखातील काकांनी सुरुवात केली...
गुंतता हृदय हे, ‘कमल’दलाच्या पाशी...
काकांनी सुरुवात केल्यानंतर वस्त्रहरणच करायचं असल्यानं बारामती नाटक मंडळीतील आबा पुढं आले. ‘आधी महाराष्ट्राचे तुकडे पाडणार का, नथुरामाचा निषेध करणार का, हे सांगा. मग राग आळवा...’ त्यांचा संवाद पूर्ण होण्याआधीच जयंतरावांनी अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘सौभद्र’चं पद सुरू केलं... नभ मेघांनी आक्रमिले, तारागण सर्वहि झांकुनि गेले...
आबांच्या लक्षात आलं. मोदींच्या सभेनंतर जयंतरावांनी हे पद मुखोद्गत केलंय. आबांना खिजवण्यासाठी ते मुद्दाम हेच पद म्हणतात. या पदाला ‘वन्समोअर’ मिळाला. पुढच्या रांगेत बसलेल्या अजितदादांनी हाताला बांधलेल्या गजऱ्याचा गंध खोलवर भरून घेतला आणि परत एकदा फर्माईश केली. जयंतरावांचं संपतं तोच घोरपडे सरकार, मानसिंगभाऊ, अमरबापू, जगतापसाहेब यांनी ‘हे बंध रेशमाचे’मधल्या पदाला हात घातला...
हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे
तुटतील कधी ना हे बंध रेशमाचे
जयंतरावांकडं बघून ही मंडळी गायला लागली. (त्यात सत्यजित आणि बाबा देशमुखही हळूच सामील झाल्याचं पतंगरावांच्या चाणाक्ष नजरेतनं सुटलं नाही.) पतंगराव-मदनभाऊ पुढं आले. त्यांनी बारामतीच्या नाटक मंडळींची ‘नाटकं’ कशी असतात, याचं वस्त्रहरण सुरू केलं. प्रतीकला मात्र शेट्टींच्या राजूभार्इंनी विंगेत थांबवून ठेवलं होतं. जयंतरावांचं गाणं कसं पाडायचं, त्यांना कोरस कसा मिळू द्यायचा नाही, याची ठरवाठरवी सुरू होती, पण नेमकं काय करायचं तेच कळत नव्हतं. महाडिकांनी नाईकसाहेबांना भाबडेपणानं विचारलं, ‘जयंतराव गायला लागले की पडदा पाडू का? की आॅर्गनवाल्याला उचलून नेऊ?’ जयंतरावांच्या कानावर ही कुजबूज गेली. ते आज जोमात होते. आवाजपण लागला होता. खड्या आवाजात त्यांनी ‘हे बंध रेशमाचे’मधलं पुढचं पद सुरू केलं...
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फूलही रूतावे, हा दैवयोग आहे
त्यांचं गाणं जिव्हारी लागलेल्या काहींनी मग ‘भावबंधन’मधलं...
कठीण कठीण कठीण किती... सुरू केलं. डिट्टो मास्टर दीनानाथच!
तर काहींनी देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर...
या नाट्यपदातनं ‘प्रीतिसंगम’ होतोय का बघितलं.
सोन्याचा टंच काढण्यात गुंतलेले सुधीरकाका आणि मिरज पूर्वमध्ये सरकारांच्या नाकदुऱ्या काढण्यात अडकलेले खाडे घाईगडबडीनं स्टेजवर अवतरले. प्रवेश कोणता चाललाय, नाट्यपद कोणतं म्हटलं जातंय, याचं त्यांना भानच नव्हतं. ‘अरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ हे पाठ केलेलं एकच वाक्य चार-चारदा म्हणू लागले. पुढचं काही आठवतच नव्हतं त्यांना. त्यांचं पालुपद ऐकून प्रेक्षकांतून उपहास-उपरोधानं ‘वन्समोअर’ आला. मग परत एकदा तेच वाक्य! (हशा उसळला, हे सांगायला नकोच.) अखेर ‘संगीत वस्त्रहरण’चा ‘संगीत खेळखंडोबा’ झाल्यानं पडदा पाडण्यात आला.
जाता-जाता : रंगपटात सुरेशअण्णा, मिरजेचे होनमोरे, विट्याचे अनिलभाऊ आपापल्या आरशासमोर थांबून म्हणत होते...
वद जाऊ कुणाला शरण ग...?
प्रयोग संपल्याचं त्यांना कळलंही नव्हतं! जयंतराव रूबाबात गाडीत जाऊन बसले. मागच्या सीटवरून कानावर गुणगुणनं ऐकू आलं... ‘देव दीनाघरी धावला’मधलं कुमार गंधर्वांचं पद...
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी...
जयंतरावांनी मागं वळून पाहिलं. पतंगराव गुणगुणत बसले होते. दोघं खळखळून हसले. गाडी बालगंधर्वांच्या नागठाण्याच्या दिशेनं निघाली...

- श्रीनिवास नागे

Web Title: Music Clothing - Government Letters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.