पोलीस निरीक्षकासह अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा
By Admin | Updated: May 7, 2017 21:31 IST2017-05-07T21:31:17+5:302017-05-07T21:31:17+5:30
पोलीस कोठडीतील मारहाणीत समशेर खान यांचा मृत्यू झाला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी केली

पोलीस निरीक्षकासह अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 7 - पोलीस कोठडीतील मारहाणीत समशेर खान यांचा मृत्यू झाला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी केली असून, चौकशीअंती ६ मे रोजी पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रौफ यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भुमन्ना आचेवाड यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ डिसेंबर २०१६ रोजी पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रौफ यांच्या अधिनस्त असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी समशेर खान समीर खान पठाण (३७, रा. मदिना पाटी) यास श्रीरामपूर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले. समशेर खान यास कायदेशीररित्या अटक केली नाही. तसेच नातेवाईकांना माहिती दिली नाही.
स्टेशन डायरीमध्ये नोंद घेतली नाही, असे बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन सकाळी ११ ते सायंकाळी ६.२४ वाजेपर्यंत नानलपेठ पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असून परभणी शहरातील तीन गुन्ह्यात समशेर खान याचा हात असावा, या संशयावरुन त्यास मारहाण करून ठार मारले, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक शेख अब्दुल रौफ, पोलीस हवालदार तुळशीदास देशमुख, पोकॉ. अ. मुश्ताक अ.मजीद यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३३१, ४४८, ३४ भा.दं.वि. अन्वये नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीआयडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर सुरडकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.