चिमुरडीच्या हत्येचे गूढ कायम
By Admin | Updated: March 14, 2015 05:37 IST2015-03-14T05:37:02+5:302015-03-14T05:37:02+5:30
येथील शुभदा नर्सिंग होममध्ये पाच दिवसांच्या मुलीची हॉस्पिटलच्या आवारातच हत्या झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घड

चिमुरडीच्या हत्येचे गूढ कायम
डोंबिवली : येथील शुभदा नर्सिंग होममध्ये पाच दिवसांच्या मुलीची हॉस्पिटलच्या आवारातच हत्या झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. त्याला दोन दिवस उलटले तरीही त्या हत्येचा उलगडा डोंबिवली पोलिसांना करता न आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एकामागोमाग होणाऱ्या हत्यांमुळे नागरिक दहशतीच्या छायेखाली असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृहमंत्र्यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. पोलिसांच्या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही.
शुक्रवारी पोलिसांनी दिवसभर रुग्णालयातील नर्स, मावशांसह (आया) जेथे बाळ होते, त्या वॉर्डामधील आजूबाजूच्या पेशंट्सची चौकशी-फेरतपासणी केली. तसेच मुलीच्या आईसह दोन्हीकडील आजींचीही चौकशी केली़ परंतु, तरीही तपासातून मात्र काहीही निष्पन्न झाले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी सांगितले.
त्या कॅमेऱ्याचे फुटेज तपासणार?
रुग्णालयाच्या मागील बाजूस जेथे हत्या झाल्यावर मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणच्या परिसरात सीसी कॅमेरा नसल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच जेथून रुग्णालयात एण्ट्री केली जाते, तेथे कॅमेरा आहे. त्यातील फुटेजची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले.