अपहरणकर्त्या मावस भावानेच केली वैभवची हत्या
By Admin | Updated: September 7, 2015 00:10 IST2015-09-07T00:10:12+5:302015-09-07T00:10:12+5:30
वाशिम जिल्ह्यातील घटना; दोन दिवसांपुर्वी केले होते अपहरण.

अपहरणकर्त्या मावस भावानेच केली वैभवची हत्या
वाशिम : दोन दिवसांपुर्वी अपहरण झालेल्या १४ वर्षीय वैभव वामन महाले या मुलाचा मृतदेह रविवारी आसेगाव पोलीस ठाण्यातर्गत असलेल्या सनगाव शेतशिवारात आढळल्याने एकच खळबळ उडाली. वैभवचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची कबुली मृताचा मावस भाऊ मदन वानखेडे याने पोलीसांना दिली. शुक्रवार सायंकाळ ७ वाजतापासून वैभव महाले हा त्याच्या मावसभाऊ मदन बालाजी वानखेडे (२0) याच्यासोबत घराबाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंंत दोघेही घरी न आल्यामुळे महाले कुटूंब चिंताग्रस्त झाले होते. अखेर मृताचे वडील वामन महाले यांनी ५ सप्टेंबर रोजी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून मदन वानखेडे याचेविरूध्द भादंवी कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी या दोघांचा कसुन शोध घेतला असता ६ सप्टेंबर रोजी आरोपी मदन वानखेडे हा वाशिम येथील रेल्वे स्टेशनवर आढळुन आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने वैभवची हत्या करून त्याचा मृतदेह आसेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या सनगाव गावानजीक रस्त्याच्या बाजुला असलेल्या एका नाल्यात फेकुन दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठुन वैभवच्या मृतदेह स्थळाचा पंचनामा करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रूग्णालयामध्ये ठेवला. दरम्यान, वैभव हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वैभवच्या संपत्तीवर डोळा असल्याने मदन याने वैभवची हत्या केल्याची माहिती समोर आली. वैभव हा वाशिम येथील शिवाजी शाळेत इयत्ता आठव्या वर्गात शिकत होता.