अंधेरीत भररस्त्यात व्यापा-याची हत्या
By Admin | Updated: February 4, 2016 11:08 IST2016-02-04T08:50:48+5:302016-02-04T11:08:13+5:30
अंधेरीच्या गिलबर्ट रोडवर वर्दळीच्यावेळी भररस्त्यात एका व्यापा-याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामु धोत्रे असं मृत व्यापा-याचं नाव आहे.

अंधेरीत भररस्त्यात व्यापा-याची हत्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - अंधेरीच्या गिलबर्ट रोडवर वर्दळीच्यावेळी भररस्त्यात एका व्यापा-याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामु धोत्रे असं मृत व्यापा-याचं नाव आहे. धोत्रे यांचा ट्रान्पोर्टचा व्यवसाय आहे. धोत्रे रस्त्यातून चालत असताना तीन आरोपी त्यांच्यासमोर आले. त्यांच्याजवळ धारदार शस्त्रास्त्रे होती.
त्यातील एकाने रामु यांच्यावर वार केले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा भाऊमध्ये पडला. पण आरोपींनी त्याच्यावरही वार केले. हा हल्ला झाला त्यावेळी रस्त्यावर नागरीकांची वर्दळ होती. हल्ल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यावेळी स्थानिकांनी दोघा आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले. एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला.
या संपूर्ण हल्ल्याचा थरार तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रामू यांना जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. पोलिस ताब्यात असलेल्या दोन आरोपींची कसून चौकशी करत आहेत.