जालन्यातील अपहृत दुसर्या बालिकेचीही हत्या
By Admin | Updated: May 22, 2014 05:17 IST2014-05-22T05:17:10+5:302014-05-22T05:17:10+5:30
तिचा मृतदेह बुधवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कल्पना सोनुने (२२) या मुख्य सूत्रधारासह विजय गवळी, त्याची पत्नी वंदना आणि संदीप नेवरे (२८) या चौघांना अटक केली आहे.

जालन्यातील अपहृत दुसर्या बालिकेचीही हत्या
वालसावंगी (जालना) : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील पायल वाघमारे या नऊ महिन्याच्या चिमुकलीची खंडणीसाठी हत्या केल्याची घटना उघड होऊ नये म्हणून प्रत्यक्षदर्शी लक्ष्मी सोनुने या सहावर्षीय मुलीच्या कंबरेला दगड बांधून विहिरीत ढकलून देण्यात आले. तिचा मृतदेह बुधवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कल्पना सोनुने (२२) या मुख्य सूत्रधारासह विजय गवळी, त्याची पत्नी वंदना आणि संदीप नेवरे (२८) या चौघांना अटक केली आहे. वालसावंगी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांची मुलगी पायलला कडेवर घेऊन लक्ष्मी १९ मे रोजी घराबाहेर पडली. तेव्हापासून या दोन्ही मुली गायब होत्या. वाघमारे यांच्या पत्नीच्या मोबाईलवर ‘चिमुकली पाहिजे असेल तर दीड लाख द्या’ असा खंडणीचा फोन आला. त्याचवेळी शेजार्याच्या घरात तिचा मृतदेह आढळून आला होता. या मोबाईलचे ‘डीटेल्स’ गोळा केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य विजय गवळी व त्याची पत्नी वंदना यांना ताब्यात घेतले. त्या दोघांनी आपला मोबाईल महिनाभरापूर्वीच हरवल्याचा दावा केला होता. या मोबाईलवरुन वरून संदीपला नेहमीच कॉल गेल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.. खंडणीसाठी कल्पना सोनुने या गावातील युवतीने खेळण्याच्या बहाण्याने या दोघींना पळविले. याकामी विजय गवळीसह इतर आरोपींनी तिला मदत केली. परंतु पायल सतत रडत असल्याने आरोपींनी तिचे तोंड दाबले. त्यातच ती गतप्राण झाली. त्यामुळे तिचा मृतदेह शेजार्याच्या घरातील स्वच्छतागृहात टाकून आरोपी फरार झाले. हा प्रकार लक्ष्मीने पाहिला असल्याने तिच्या कंबरेला दगड बांधून आरोपींनी वालसावंगी शिवारातील विहिरीत फेकून दिले. यात तिचा मृत्यू झाला.