मुरळीवर सक्तीचे मातृत्व !

By Admin | Updated: December 26, 2014 02:00 IST2014-12-26T02:00:59+5:302014-12-26T02:00:59+5:30

पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेतून देवाशी लग्न लावून मुरळी बनलेल्या १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण

Murali forced motherhood! | मुरळीवर सक्तीचे मातृत्व !

मुरळीवर सक्तीचे मातृत्व !

अकोले (जि. अहमदनगर) : पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणा-या महाराष्ट्रात अंधश्रद्धेतून देवाशी लग्न लावून मुरळी बनलेल्या १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण झाल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर सक्तीचे मातृत्व लादले गेल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघड झाला आहे. पीडित मुलीला अडीच महिन्यांचे तान्हे बाळ आहे.
एका सामाजिक संस्थेने याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आजीला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीचे आई-वडील वीटभट्टीवर रोजंदारी करून त्यांची उपजीविका करतात. या कष्टकरी कुटुंबाला पाच मुली आहेत. मुलीच्या आजीने नवस फेडण्याच्या नावाखाली तिचे खंडोबा देवाशी लग्न लावून तिला मुरळी बनवले. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणारे हेरंब कुलकर्णी यांनी तिला पाच वेळा वेगवेगळ्या शाळेत दाखल करून शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न केला. मुलीला मराठी शाळा तसेच आश्रमशाळेत दाखल करून पाहिले. मात्र त्यांच्या प्रयत्नास यश आले नाही.
मुलीच्या आजीने तिला शिकण्यापासून परावृत्त करत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमास पाठवण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान तिचे लैंगिक शोषण तर झालेच मात्र ही अल्पवयीन मुलगी माता झाली आहे. कुलकर्णी यांच्या हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे, राजेंद्र धारणकर यांनी स्पार्क संघटनेच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीसांनी पीडित मुलीस व तिच्या आजीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जाबजबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी तालुक्यातील वाघ्या-मुरळी यांची चौकशी सुरु केली आहे. पीडित मुलगी व तिच्या बाळास सध्या महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Murali forced motherhood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.