मुख्य सचिव पदाची सूत्रे मल्लिक यांनी स्वीकारली
By Admin | Updated: March 1, 2017 05:53 IST2017-03-01T05:53:19+5:302017-03-01T05:53:19+5:30
सुमित मल्लिक यांनी मंगळवारी मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून मंत्रालयातील दालनात स्वीकारली

मुख्य सचिव पदाची सूत्रे मल्लिक यांनी स्वीकारली
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे ज्येष्ठ सनदी अधिकारी सुमित मल्लिक यांनी मंगळवारी मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून मंत्रालयातील दालनात स्वीकारली. राज्याच्या चौफेर विकासासाठी प्रशासनाचे १०० टक्के सहकार्य असावे, यावर आपला भर असेल, असे मल्लिक यांनी सांगितले. १३ मार्च १९५८ रोजी जन्मलेले मल्लिक हे मूळचे कोलकाता येथील आहेत. ते १९८२मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले. १९८३मध्ये नागपूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली, अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूर, महाराष्ट्र हातमाग मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईत अतिरिक्त जिल्हाधिकारी (यूएलसी) म्हणून त्यांनी काम पाहिले. जिल्हाधिकारी, मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव, विभागीय आयुक्त, राज्यपालांचे सचिव, शालेय शिक्षण सचिव, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले
आहे. (विशेष प्रतिनिधी)
>स्वाधीन क्षत्रिय सेवा हक्क आयुक्त
मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची नियुक्ती राज्य मुख्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. ते राज्यपालांकडून बुधवारी शपथ घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही आहेत. हा कायदा पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाच्या व्हिजनचा भाग मानला जातो. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आयुक्त या नात्याने क्षत्रिय यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते आयोगाचे पहिले आयुक्त असतील.