साथी थोपवण्यासाठी पालिका सज्ज

By Admin | Updated: August 25, 2016 02:11 IST2016-08-25T02:11:04+5:302016-08-25T02:11:04+5:30

गणेशोत्सवास लवकरच प्रारंभ होणार असून, पाठोपाठ इतरही सण, उत्सव साजरे होणार आहेत.

The municipality ready to abstain | साथी थोपवण्यासाठी पालिका सज्ज

साथी थोपवण्यासाठी पालिका सज्ज


मुंबई : गणेशोत्सवास लवकरच प्रारंभ होणार असून, पाठोपाठ इतरही सण, उत्सव साजरे होणार आहेत. या कालावधीत साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये, म्हणून आरोग्य जनजागृती शिबिरे मोठया प्रमाणात आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापौर निवास येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत प्रशासनाने ही माहिती दिली. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्नेहल आंबेकर यांनी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सर्व कामांचा आढावा घेतला. पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य साथीच्या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी, प्रभावी पद्धतीने सर्व भागांत जनजागृतीचे उपक्रम हाती घ्यावेत, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी बैठकीत प्रशासनाला दिले. लोकप्रतिनिधी, नागरिक व त्या-त्या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांचा जनजागृती उपक्रमांमध्ये सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. प्रत्येक सोसायटीत आरोग्यविषयक भित्तिपत्रके प्रदर्शित करण्यात यावीत. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मोबाइल व्हॅन सुरू करून जनजागृती करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
महानगरांतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चर्चा होत असताना, महापालिका व इतर प्राधिकरण यांनी संयुक्त बैठक घेऊन, गणेश आगमनांपूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले, तसेच सागरी किनारी रस्ता (कोस्टल रोड) सध्याची स्थिती व त्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा या वेळी आढावा घेण्यात आला. पावसाळ्यानंतर लवकरच सिमेंट रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार असून, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय नूतनीकरणाच्या कामालाही गती देण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The municipality ready to abstain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.