मदतकार्यासाठी पालिकेचे पथक
By Admin | Updated: July 31, 2014 11:03 IST2014-07-31T10:56:19+5:302014-07-31T11:03:15+5:30
दुर्घटनाग्रस्त गावात मदतीसाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही दुपारी तीनच्या सुमारास माळीण गावाकडे रवाना झाले.

मदतकार्यासाठी पालिकेचे पथक
पुणे : आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात पावसाने डोंगरकडा कोसळल्याने गाव जमिनीखाली गाडले आहे. या दुर्घटनाग्रस्त गावात मदतीसाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथकही दुपारी तीनच्या सुमारास माळीण गावाकडे रवाना झाले. या पथकात अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असून, शोध कार्यासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य या पथकासमवेत पाठविण्यात आले असल्याची माहिती महापौर चंचला कोद्रे आणि पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने यांनी दिली.
> ही दुर्घटना घडल्याची बाब सकाळी समोर आल्यानंतर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या पुणे महापालिकेने तत्काळ एक पथक मदतकार्यासाठी पाठविले. त्यानुसार ६ जवानांचा समावेश असलेले अग्निशमन दलाचे एक शोध आणि बचाव पथक दुपारी तीनच्या सुमारास माळीणकडे रवाना करण्यात आले. त्यात चार जवान, एक चालक, तसेच एका अग्निशमन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाकडे रात्रीच्या मदतकार्यासाठी आवश्यक असलेली बूम लाईटची फायरगाडी, जनसेट, हाय टॉर्च, हेल्मेट टॉर्च, लाईट मास्क, असे बचावाचे अत्याधुनिक साहित्य असल्याचे सोनूने यांनी स्पष्ट केले.
दरडी का कोसळताहेत ?
> दरड कोसळण्याच्या ज्या घटना घडल्या त्याचं मुख्य कारण जंगलतोड. झाडांची मुळं डोंगराची माती घट्ट धरून ठेवतात. परंतु, झाडं तोडल्यानं आणि सततच्या पावसानं ही माती सैल होते आणि ती ढिगारे किंवा दरडीच्या स्वरूपात खाली येतात. याशिवाय मोठ्या प्रमाणात डोंगर फोडण्यासाठी जे सुरूंग लावले जातात त्याचाही परिणाम डोंगर कमकुवत होण्यात होतो. त्यामुळंही दरडी कोसळत आहेत.
> उन्हाळ्यात कोकणातील डोंगरांना वर्षानुवर्षे वनवे लावले जातात. लाकूड माफिया हे काम बेभोबाट करतात. विजेचा एक खांब जंगलातून न्यायचा असेल, तर त्याला विरोध करणारे वन खाते हे वनवे थांबवू शकत नाही. त्यामुळं दर वर्षी लाखो झाडं भस्मसात होत आहेत. हेच प्रमाण कायम राहिलं,तर कोकणातील डोंगरं उघडी-बोडखी व्हायला वेळ लागणार नाही. असं झाल्यास दरडी कोसळण्याचा धोक कित्येक पटीनं वाढू शकतो.
> दुसरीकडं नवी मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यत जिकडं तिकडं हितसंबंधीयांनी डोंगर कुरतडलेले दिसतात. हे कोणी थांबवू शकत नाही. कारण हे उद्योग करणारेच सरकारमध्ये आहेत. विकासाच्या गोंडस नावाखाली इको सेन्सेटिव्ह झोनला विरोध करणारेही तेच आहेत. त्यामुळे येत्या काही काळात दरडी कासळण्याच्या घटना वाढणार, हे नक्की.
> निसर्ग आणि सामान्यांच्या विरोधात सुरू असलेलं हे षड्यंत्र थांबविता
येत नाही, तर किमान दरडी कोसळण्याचा ज्या गावांना धोका आहे, अशी गावं धोकारेषेच्या बाहेर हलविली गेली पाहिजेत. तेही होत नाही. - एस. एम. देशमुख