नगरपालिकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यमुक्त!
By Admin | Updated: July 5, 2014 23:48 IST2014-07-05T22:34:00+5:302014-07-05T23:48:40+5:30
नगरपालिकांच्या अध्यक्षांनी आज ५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.

नगरपालिकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यमुक्त!
खामगाव: घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर आणि जळगाव जामोद नगरपालिकांच्या अध्यक्षांनी आज ५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. नगर पालिका निवडणुकीसाठी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण दर्शवून विद्यमान नगराध्यक्षांना शासनाने १0 जून रोजी ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. या निर्णयाविरोधात काही नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. दरम्यान, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय रद्द झाल्याने आज शनिवारी ५ जुलै रोजी निवडणूक लावण्याची प्रक्रीया शासनाने हाती घेतली असून जिल्हाधिकार्यांच्या विशेष आदेशानुसार घाटाखालील पाचही नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पदभार उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी स्विकारला आहे. खामगाव नगर पालिकेचे अध्यक्ष गणेश माने, उपाध्यक्ष संतोष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे सुपूर्द केला. येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा प्रभार उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे शेगाव नगर पालिकेचे अध्यक्ष शिवाजीराव बुरूंगले यांनी दुपारी १ वाजता तर उपाध्यक्ष रविंद्र रायणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा प्रभार तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी सांभाळणार आहेत. नांदुरा नगर पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. सुशिलाताई नांदुरकर, उपाध्यक्ष नवृत्ती इंगळे यांनी नायब तहसीलदार शेलार यांच्याकडे राजीनामा दिला. नांदुरा येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्षांचा प्रभार नायब तहसीलदार शेलार यांच्याकडे राहणार आहे. तसेच जळगाव जामोद नगर पालिकेच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई वाकेकर, उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचा प्रभार तहसीलदार चव्हाण यांनी सांभाळला. यावेळी संबंधित नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध पक्षाचे राजकीय नेते, नगरसेवक उपस्थित होते
** मलकापूर नगराध्यक्षांचा राजीनाम्यास खो
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची राजीनाम्यासंदर्भातील माहिती मलकापूर नगराध्यक्षांकडे दिल्यानंतरही हाजी रशीद खान जमादार यांनी स्वत:हून राजीनामा सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्या पदाचा प्रभार उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखडे यांना एकतर्फी घ्यावा लागला. उपाध्यक्ष अँड. गजानन सोमण यांनी राजीनामा सादर केल्यानंतर उपविभागीय अधिकार्यांनीही उपाध्यक्षपदाचा प्रभार स्विकारला.
** पदावरून पायउतार झाल्यानंतर केले भूमिपूजन!
खामगाव नगर पालिकेचे नगराध्यक्ष गणेश माने यांनी राजीनामा सादर केल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास योजनेअंतर्गत जनुना तलाव विकसीत करण्याच्या कामाचे तसेच महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान अंतर्गत घाटपुरी नाका रस्ता कामाचे भुमिपूजन केल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविकांनी केला आहे. काँग्रेस नगरसेवकांच्या या आरोपांमुळे सत्ताधारी आघाडीत खळबळ उडाली होती.