महापालिका निवडणुका स्वबळावर - जानकरांचे सूतोवाच
By Admin | Updated: January 21, 2016 03:53 IST2016-01-21T03:53:05+5:302016-01-21T03:53:05+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सोबत करणाऱ्या महादेव जानकर यांनी आगामी महापालिका निवडणुका मात्र स्वबळावर लढविणार

महापालिका निवडणुका स्वबळावर - जानकरांचे सूतोवाच
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सोबत करणाऱ्या महादेव जानकर यांनी आगामी महापालिका निवडणुका मात्र स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जानकर म्हणाले की, ‘रासप आज जरी महायुतीत असली, तरी स्थानिक निवडणुका मात्र स्वतंत्रपणेच लढविणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत तीन ठिकाणी रासप उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. या तीन जागांप्रमाणेच मुंबईतील निवडक ठिकाणी रासप आपले उमेदवार उभे करेल. उत्तर भारतीय मतदारांना जोडण्यासाठी पक्षाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातील,’ असे जानकर म्हणाले. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थांमध्येही एकहाती सत्ता मिळवावी, अन्य पक्षांचा टेकू घेऊ नये, असे भाजपा नेत्यांना वाटू लागले आहे. त्यांना घटकपक्षांची आवश्यकता नाही. त्यामुळे रासपनेही महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली आहे, असे जानकरांनी सांगितले.