नगरपालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरु

By Admin | Updated: July 4, 2016 03:21 IST2016-07-04T03:21:45+5:302016-07-04T03:21:45+5:30

जिल्ह्यातील १० नगरपालिकांचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

For the municipal corporation, the alliance started | नगरपालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरु

नगरपालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरु

आविष्कार देसाई,

अलिबाग- जिल्ह्यातील १० नगरपालिकांचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आरक्षणानुसार विविध पक्षांनी आपली व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्याचा दौरा लावला आहे, तर काहींनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामाध्यमातून युती, आघाड्या कोणत्या पक्षाबरोबर करायच्या याची चाचपणी करण्यावर प्रथम भर देण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे वारे आतापासूनच वाहण्यास सुरुवात झाली आहे.
५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने नव्याने पडलेल्या आरक्षणामुळे विविध प्रस्थापितांना आपला प्रभाग सोडून सोयीस्कर प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. या निवडणुकीपासून नगराध्यक्ष हा थेट जनतेमधून निवडून द्यायचा असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. त्यामुळे तेथे आपापले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष ताकदीने उभे राहणार आहेत. यासाठी त्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रभागनिहाय पडलेल्या आरक्षणावर चर्चा होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काँग्रेस आणि शेकाप या समविचारी पक्षांना एकत्र घेण्यावरही विचार होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकांची तयारी म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रायगडचा दौरा १७ जुलैपासून सुरु करणार आहेत. त्यावेळी ते प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेणार आहेत. आरक्षणामुळे चित्र बदलले असल्याने तेथे निवडून येणाऱ्या उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आर.सी.घरत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. स्थानिक परिस्थितीनुसार तेथील राजकीय समीकरणे अवलंबून राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.महानगरपालिका जाहीर करुन दुसरीकडे नगर पालिकांच्या निवडणुका घेतल्या जात आहे. असे करून सरकार जनतेच्या डोळ््यात धूळफेक करीत आहे, असे शेकापचे वरिष्ठ नेते तथा माजी आमदार विवेक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आरक्षणामुळे काम करणाऱ्यांना कधीच फरक पडत नाही. याही निवडणुकीत शेकापला वातावरण चांगले आहे. जातीय आणि धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आरक्षणामुळे विशेष बदल घडणार नाही. मतदारांची मानसिकता तयार झाली आहे. विकासकामांचा सकारात्मक दृष्टिकोन भाजपाच्या कामी येणार असल्याने स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष सतीश धारप यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सुरू असलेला भ्रष्टाचार, टक्केवारी आणि नियोजनशून्य कारभार यावर आमचा जोर राहणार असल्याचे त्यांनी सांगून व्हिजन डॉक्युमेंटवरील काम अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
>प्रभात रचनेत बदल
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, खोपोली, रोहा, मुरुड, माथेरान, महाड, श्रीवर्धन या नगर पालिकांची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे नव्याने निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २ जुलै रोजी नगर पालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत लॉटरी पध्दतीने काढण्यात आली. ५० टक्के महिलांना आरक्षण पडले आहे.
आरक्षण चुकीचे पडल्याने आरक्षणाबाबत काही ठिकाणी हरकती येण्याची शक्यता आहे. शिवसेनेसाठी जिल्ह्यामध्ये स्थिती चांगली आहे. शेकाप जिल्ह्यातून कमी होत असल्याने त्या पक्षाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी राहील, असे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एकूणच जिल्ह्यामध्ये नगर पालिकांच्या निवडणुकीने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: For the municipal corporation, the alliance started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.