मुंडे कुटुंबियांविरुद्ध उमेदवार देणार नाही
By Admin | Updated: June 21, 2014 23:48 IST2014-06-21T22:45:45+5:302014-06-21T23:48:06+5:30
मुंडे कुटुंबातील उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नाही. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले़

मुंडे कुटुंबियांविरुद्ध उमेदवार देणार नाही
मुंडे कुटुंबियांविरुद्ध उमेदवार देणार नाही
-शरद पवारांची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली
मुंबई - बीड लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत मुंडे कुटुंबातील उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नाही. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले़
दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी एनसीपीए सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. मुंडे यांचे कर राजकीय विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते पवार यांनी मुंडे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडले. ते म्हणाले, सामान्य कुटुंबातून येऊन मुंडेंनी जी उंची गाठली त्यासाठी प्रचंड कष्ट आणि जनसामान्यांच्या प्रश्नांशी समरस व्हावे लागते, अभ्यास करावा लागतो आणि कार्यकर्त्यांचा संच उभा करावा लागतो. मुंडे यांनी ते केलं. एक नेता म्हणून त्यांच्या संघर्षाचा विषय निघेल तेंव्हा माझ्या उल्लेखाशिवाय ती ओळख पूर्ण होणार नाही. एकाचवेळी साखर कारखानदार, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी मुंडे यांनी विधायक भूमिका पार पाडली आहे, असे पवार यांनी सांगितले.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह म्हणाले, वंचितांच्या विकासाचा प्रयत्न करणे, हीच गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रध्दाजंली ठरेल. पंकजा मुंडे समर्थपणे गोपीनाथरावांचा वारसा चालवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर एक भाऊ म्हणून कायम तुझ्या पाठीशी उभा असेन, असा धीर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजाला दिला.
यावेळी रिपाइं अध्यक्ष खा. रामदास आठवले, खा. राजू शेी, मनसे गटनेता आ. बाळा नांदगावकर, आ. विनायक मेटे, महादेव जानकर आणि मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
मुंडे आणि घड्याळ
मुंडे आणि घड्याळ्याचे नाते कधी जमलेच नाही. मग ते वेळेचे घड्याळ असेा की, राष्ट्रवादीचे! वेळ न पाळण्याच्या त्यांच्या सवयीची राजकीय चेष्टाही झाली. मात्र, कधीही वेळ न पाळणारा हा नेता मृत्यूची भेट घेण्यासाठीच वेळेपूर्वी का गेला, हे न उलघडणारे वेदनादायी कोडे आहे, अशी भावना शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली तेव्हा अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.