मुंबईत १५ वर्षांखालील मुलींच्या गर्भपातामध्ये ६७ टक्क्यांनी वाढ
By Admin | Updated: May 14, 2015 11:07 IST2015-05-14T11:06:19+5:302015-05-14T11:07:48+5:30
मुंबईतील १५ वर्षांपेक्षा खालील मुलींच्या गर्भपाताच्या प्रमाणात तब्बल ६७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत १५ वर्षांखालील मुलींच्या गर्भपातामध्ये ६७ टक्क्यांनी वाढ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - मुंबईतील १५ वर्षांपेक्षा खालील मुलींच्या गर्भपाताच्या प्रमाणात तब्बल ६७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत ३१ हजार महिलांनी गर्भपात केला असून यातील १,६०० मुली या १९ वर्षांखालील होत्या. मुंबईतील अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताचे वाढते प्रमाण हे चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
मुंबई महानगरपालिकेने शहरातील अधिकृत गर्भपात केंद्रात झालेल्या गर्भपातांची माहिती संकलीत केली आहे. माहिती अधिकारांतर्गत शहरातील गर्भपाताची आकडेवारी समोर आली आहे. २०१३ -१४ या वर्षात मुंबईत १५ वर्षांखालील १११ अल्पवयीन मुलींनी गर्भपात केला होता. मात्र २०१४ - १५ मध्ये हे प्रमाण ६७ टक्क्यांनी वाढून थेट १८५ वर गेले आहे. २०१३ -१४ मध्ये १५ -१९ या वयोगटातील ९६२ मुलींनी गर्भपात केला होता. तर आता २०१४ -१५ मध्ये याच वयोगटातील मुलींमधील गर्भपाताचे प्रमाण १,४१० पर्यंत पोहोचले आहे. १९ वर्षांखालील मुलींमध्ये गर्भपाताचे वाढते प्रमाण ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. किशोरवयात लैंगिक संबंधांविषयीची उत्सुकता किंवा लैंगिक शोषण हे अल्पवयीन मुलींमधील गर्भधारणेचे प्रमुख कारण असू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईतील सर्वच शाळांमध्ये आता लैंगिक शिक्षण सुरु करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे असे मत एका सामाजिक कार्यकर्त्याने मांडले आहे.
२०११ - १२ मध्ये मुंबईत एकूण गर्भपाताचे प्रमाण १७, ३०९ होते. चार वर्षात यात लक्षणीय वाढ झाली असून २०१४ - १५ मध्ये गर्भपाताचे प्रमाण ३०, ७४२ पर्यंत पोहोचले आहे.