मुंबईच्या शेफालीचा ‘सुवर्ण’ विक्रम एमबीबीएसमध्ये 12 पदके
By Admin | Updated: June 1, 2014 01:39 IST2014-06-01T01:39:53+5:302014-06-01T01:39:53+5:30
आरोग्य विद्यापीठाच्या इतिहासात इतक्या प्रमाणात पदके मिळवणारी शेफाली ही पहिलीच सुवर्णकन्या ठरली आहे.

मुंबईच्या शेफालीचा ‘सुवर्ण’ विक्रम एमबीबीएसमध्ये 12 पदके
>नाशिक : मुंबईच्या सेठ जी.एस. मेडिकल महाविद्यालयाची विद्यार्थिनी शेफाली प्रदीप परीख हिने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी असलेली तब्बल 12 सुवर्णपदके मिळवून इतिहास रचला आहे. आरोग्य विद्यापीठाच्या इतिहासात इतक्या प्रमाणात पदके मिळवणारी शेफाली ही पहिलीच सुवर्णकन्या ठरली आहे.
या पदवीप्रदान सोहळ्यासाठी शेफाली प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाही. तिच्या वतीने तिची आई बहुला परीख यांनी सुवर्णपदके स्वीकारली. एमबीबीएस तृतीय वर्ष (भाग 2), पहिली विद्यार्थिनी, सर्वाधिक गुण, ऑब्स्ट्रीक्स अॅण्ड गायनॅकॉलॉजी, मेडिसीन, जनरल सर्जरी, जनरल मेडिसीन, पेडियाट्रीक्स या विषयांतील सर्वच्या सर्व सुवर्णपदके शेफालीने पटकावली आहेत. शिवाय, एक रोख पारितोषिकदेखील तिने मिळवले आहे. शेफाली सध्या लंडनमध्ये असून तिथे ती पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणार आहे. तिला नृत्य आणि वादविवाद स्पर्धेतही अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. शेफालीला बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रत नाव करण्याची इच्छा असल्याचे तिच्या मातापित्याने सांगितले.
शेफालीच्या वतीने तिची आई बहुला यांनी सुवर्णपदके स्वीकारली. आपल्या कन्येची कामगिरी पाहून मी भारावून गेले. शेफालीने आयुष्यात अविस्मरणीय व अभिमान वाटावा असा क्षण दिला आहे, अशा शब्दांत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.