मुंबईत शाळा झोपलेल्याच!
By Admin | Updated: January 17, 2015 06:11 IST2015-01-17T06:08:42+5:302015-01-17T06:11:55+5:30
पाकिस्तानामधील पेशावर येथील लष्कराच्या शाळेवरील अतिरेकी हल्ल्याने सारे जग सुन्न झाले़ दहशतवादाला रंग व धर्म नसतो

मुंबईत शाळा झोपलेल्याच!
लोकमत टीम, मुंबई
पाकिस्तानामधील पेशावर येथील लष्कराच्या शाळेवरील अतिरेकी हल्ल्याने सारे जग सुन्न झाले़ दहशतवादाला रंग व धर्म नसतो, हे या हल्ल्याने अधोरेखित झाले. या निर्दयी दहशतवादाने अनेक दु:खांवर एका गोंडस हसण्याने फुंकर मारणाऱ्या निष्पाप चिमुकल्यांना निर्घृणपणे संपवले. या घटनेने जगातील प्रत्येक पालकाच्या मनात काहूर माजले़ माझ्या मुलाची शाळा सुरक्षित आहे का, या प्रश्नाने पालकांची झोप उडाली़ प्रत्येक घराला बेचैन करणाऱ्या या प्रश्नाचा मागोवा घेण्यासाठी ‘टीम लोकमत’ने आकस्मिकपणे मुंबईतील सर्व स्तरातील शाळांना भेट दिली़ या भेटीने मुंबईतील शाळा सुरक्षेच्या बाबतीत अजूनही गाढ झोपेतच असल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले़
मुुंबई हे दहशवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे, हे नव्याने सांगायला नको़ देशात कोठेही हल्ला झाला की मुंबईला सुरक्षेचा इशारा दिला जातो़ गेल्या महिन्यात झालेल्या पेशावर हल्ल्यानंतरही केंद्र सरकारने देशातील सर्व शाळांना सुरक्षेचे नियम धाडले़ पेशावर घटनेला आज जवळपास २० ते २५ दिवस उलटून गेले आहेत़ असे असताना मुंबईतील शाळांनीही सुरक्षेकडे प्राधान्याने कडेकोट लक्ष देणे आवश्यकच आहे़ शाळा मात्र अजूनही तुटपुंज्या सुरक्षा रक्षकांवर निर्भर आहेत; तर लष्कराच्या शाळांनी शस्त्रधारी जवान ठेवून पाठ थोपटून घेतली आहे. मात्र हे जवानही तितके सतर्क नसल्याचे वास्तव या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून समोर आले. उच्च न्यायालयानेही एका निकालात मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असल्याचा निर्वाळा दिला आहे़ हा निकाल गेल्या दशकातला आहे़ त्यामुळे शाळांना नव्याने सुरक्षेचे नियम धाडणे तितकेसे व्यवहार्य नाही़ मात्र काही शाळांनी सुरक्षेकडे लक्ष दिले आहे़ पालकाला ओळखपत्र देणे, अनोळखी व्यक्तीला शाळा आवारात न सोडणे यासह सुरक्षेची काळजी घेतली आहे़ मात्र अशा शाळा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच आहेत. अन्य शाळांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शाळेला किमान एक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे असल्याचा अनुभव या वेळी ‘टीम लोकमत’ला आला.