मुंबईच्या आमदारांची ‘अळीमिळी गुपचिळी!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 02:10 IST2016-08-03T02:10:28+5:302016-08-03T02:10:28+5:30
राज्याच्या विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईकरांनी मतदानाद्वारे निवडून दिलेल्या आमदारांनी विधानसभेत मात्र चुप्पी साधली

मुंबईच्या आमदारांची ‘अळीमिळी गुपचिळी!’
मुंबई : राज्याच्या विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईकरांनी मतदानाद्वारे निवडून दिलेल्या आमदारांनी विधानसभेत मात्र चुप्पी साधली आहे. २०११ ते २०१४ या कालावधीत मुंबईतील आमदारांनी दरवर्षी सरासरी ९ हजार ६५५ प्रश्न विधानसभेत उपस्थित केले होते. याउलट २०१६ साली विधानसभेत केवळ ४ हजार ३४३ म्हणजेच ५० टक्क्यांहून कमी प्रश्न उपस्थित केल्याची माहिती समोर आली आहे.
प्रजा फाउंडेशनने मंगळवारी जाहीर केलेल्या आमदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील एकूण ३६ आमदारांपैकी चार मंत्री आणि उशिराने निवड झालेल्या आमदार तृप्ती सावंत यांना वगळल्यास उरलेल्या ३१ आमदारांचे रिपोर्ट कार्ड प्रजाने या वेळी मांडले.
त्यात केवळ ७ आमदारांनी एका वर्षात १५० हून अधिक प्रश्न उपस्थित केले. तर १८ आमदारांनी ५० ते १५० प्रश्न उपस्थित केले आहेत. याउलट ६ आमदारांनी वर्षभरात ५० प्रश्नही उपस्थित केले नसल्याची माहिती प्रजाने माहिती अधिकारातून मिळवली आहे.
प्रजा फाउंडेशनचे विश्वस्त निताई मेहता म्हणाले की, सदनामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा दर्जा, प्रश्नांची संख्या, आमदारांची उपस्थिती, गुन्हेगारी रेकॉर्ड, कथित किमान भ्रष्टता, संबंधित निर्वाचन क्षेत्रापासून जनतेसाठी कथित सुगम्यता, निर्वाचन क्षेत्रासाठी कथित प्रदर्शक या सर्व गोष्टी समोर ठेवून आमदारांना गुण देण्यात आले आहेत. आमदारांना दिलेल्या गुणतालिकेत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. त्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर सर्वात शेवटचा क्रमांक भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांचा असून त्यांना प्रजाच्या रिपोर्ट कार्डमध्ये ५० टक्के गुणांचीही कमाई करता आली नाही. सर्वोत्कृष्ट १० आमदारांत पाच आमदार काँग्रेसचे, तीन शिवसेनेचे आणि दोन आमदार भाजपाचे आहेत. (प्रतिनिधी)
>आमदारांच्या प्रश्नांचा दर्जा घसरतोय
याआधी २८ आमदारांनी विधानसभेत सरासरी प्रश्न उपस्थित केले होते, तर ५ आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांचा दर्जा खालावलेला होता. दरम्यान, एकाही आमदाराने चांगल्या दर्जाचा प्रश्न उपस्थित केला नव्हता. याउलट या वर्षी एका आमदाराने चांगल्या दर्जाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
मात्र सरासरी दर्जाचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदारांची संख्या २० पर्यंत खालावली असून खालावलेल्या दर्जाचे प्रश्न विचारणाऱ्या आमदारांच्या संख्येत १० पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील आमदारांच्या प्रश्नांचा दर्जा खालावतोय, असा आरोप प्रजाने केला आहे.
>आमदार साहेब भेटेना...
विभागातील समस्या ऐकून घेण्यासाठी मतदारांना आमदारांची उपलब्धता आवश्यक असते. २०११-१४ दरम्यान सरासरी १ आमदाराचा नागरिकांशी उत्तम संपर्क होता. तर १७ आमदार लोकांना सरासरी भेटत असून १५ आमदार नागरिकांसाठी उपलब्ध नसल्याचे समोर आले होते. याउलट यंदा एकही आमदार उत्तम प्रकारे नागरिकांना वेळ देत नसल्याचे प्रजाने मांडले आहे. तर केवळ ६ आमदार लोकांना सरासरी उपलब्ध होत असून २५ आमदार लोकांना भेटतच नसल्याचे प्रजाने सांगितले.
>अमिन पटेल सर्वोत्कृष्ट आमदार
काँग्रेस आमदार अमिन पटेल यांना सर्वोत्कृष्ट आमदाराचा दर्जा प्रजा फाउंडेशनने मांडलेल्या अहवालात मिळाला आहे. आॅक्टोबर २०१४ ते मार्च २०१६ दरम्यान पटेल यांनी विधानसभेत सर्वाधिक म्हणजेच १ हजार ५५ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याखालोखाल अस्लम शेख (४८७), सुनील प्रभू (२६१) आणि वर्षा गायकवाड (२४०) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या त्यांच्या खालोखाल असलेल्या तिन्ही आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या संख्येच्या बेरजेहून अधिक आहे.