नद्यांच्या संवर्धनासाठी मुंबईची आगेकूच
By Admin | Updated: March 6, 2017 02:40 IST2017-03-06T02:40:43+5:302017-03-06T02:40:43+5:30
ओशिवरा, पोईसर, दहिसर आणि मिठी मुंबईतल्या चार प्रमुख नद्या; मात्र सद्यस्थितीमध्ये या चारही नद्यांची अवस्था वाईट झाली आहे.

नद्यांच्या संवर्धनासाठी मुंबईची आगेकूच
सागर नेवरेकर,
मुंबई- ओशिवरा, पोईसर, दहिसर आणि मिठी मुंबईतल्या चार प्रमुख नद्या; मात्र सद्यस्थितीमध्ये या चारही नद्यांची अवस्था वाईट झाली आहे. रसायन मिश्रित सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जात असून, नद्या ‘मृत’ होत आहेत. परिणामी ‘मृत’ नद्यांना वाचवण्यासाठी ‘रिव्हर मार्च’ने मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे या मोहीमेला जलपुरुष राजेंद्र सिंह यांनीही हात दिला आहे. आणि याच निमित्ताने रविवारी सकाळी पोईसर नदीच्या संवर्धनासाठी राजेंद्र सिंह दाखल झाल्यानंतर एकत्र आलेल्या मुंबईकरांनी नद्यांच्या संवर्धनासाठी आगेकुच केली.
‘रिव्हर उत्सव’ या मोहीमेतंर्गत रविवारी सकाळी ७.३० वाजता जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले. महावीर नगर, कांदिवली व्हिलेज, पारेख नगर, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, एस.व्ही रोड, हिरानंदानी हेरीटेज आणि पोईसर जिमखाना या मार्गावरून रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीत लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते. दहा शाळांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवत नद्यांच्या संवर्धनासाठी मुंबईकरांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
राजेंद्र सिंह यांनी यावेळी रॅलीला संबोधले. ते म्हणाले, नदी ही आपली आई आहे. ती आजारी पडली आहे. आपली पोईसर नदी ही आयसीयूमध्ये आहे. तिच्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. समाज आणि सरकार जेव्हा एकत्र येईल तेव्हा नदीची स्थिती सुधारेल. आपण नदीला बांधून ठेवू शकत नाही. जर आपण बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला याचा भविष्यात वाईट परिणाम होऊ शकतो. नद्यांचे काँक्रिटायझेशन झाले आहे. त्यामुळे नदीचे उगम स्त्रोत हे बंद होतात. पोईसर नदीचे काँक्रिटायझेशन करून तिला नाला बनवले जात आहे. नदीची बिकट अवस्था झाली आहे.
>नदीचे हत्यारे हे आपल्या अवतीभवती आहेत. त्यांना रोखले पाहिजे. नदी आपल्याला विनंती करत आहे की ‘तुम्ही मला दुषित करू नका मला देखील जगु द्या.’ मला तुमच्या सर्वांचे या कारणामुळे कौतुक करावेसे वाटते की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झालात. आणि प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की पोईसर नदी ही आपली आहे.
- राजेंद्र सिंह, जलपुरुष