मुंबईतील ६००० सीसीटीव्हींचे टेंडर आज उघडणार
By Admin | Updated: September 24, 2014 05:33 IST2014-09-24T05:33:53+5:302014-09-24T05:33:53+5:30
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात ५००० क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) बसवण्याची जी योजना होती तिला अखेर मूर्त स्वरूप मिळण्याची चिन्हे आहेत

मुंबईतील ६००० सीसीटीव्हींचे टेंडर आज उघडणार
डिप्पी वांकाणी, मुंबई
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात ५००० क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) बसवण्याची जी योजना होती तिला अखेर मूर्त स्वरूप मिळण्याची चिन्हे आहेत. गृह खात्याकडे आलेल्या विविध देकारांमधून लार्सन अँड टुब्रो कंपनी आणि ट्रायमॅक्स या दोन कंपन्या पात्र ठरल्या असून, त्यापैकी कोणत्या कंपनीची निवड करायची यासाठी बुधवारी निविदा उघडण्यात येतील.
मूळ योजनेत बदल करून सीसीटीव्हींची संख्या आता ६००० करण्यात आली आहे. मूळ योजनेत ५००० ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव होता. आता काही नवी संवेदनशील ठिकाणे लक्षात आली आहेत. त्यानुसार ही संख्या वाढविली आहे, असे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. निर्णयप्रक्रियेत इतका विलंब का झाला याबाबत सूत्रांनी सांगितले, या प्रकरणी अनेक अडचणी आल्या. इच्छुक कंपन्यांपैकी फारच कमी कंपन्यांकडे योजना राबवण्याची तांत्रिक क्षमता होती. ज्यांच्याकडे तांत्रिक क्षमता होती त्यांची आर्थिक कुवत नव्हती. अभियंते आणि तंत्रज्ञांच्या एका गटाने योजनेत रस दाखवला होता. पण ते जेव्हा बँकांकडे गेले तेव्हा बँकांनी त्यांना अर्थसहाय देण्यास नकार दिला. वायरलेस तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपन्यांच्या लॉबीनेही यात रस घेतल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. वायर्ड तंत्रज्ञानावर एमटीएनएलची मक्तेदारी आहे. ती मोडण्यासाठी वायरलेस उत्पादने पुरवण्याची तयारी दाखवली. पण आम्ही जगभरातील यंत्रणांचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले की कोठेच सीसीटीव्हींसाठी वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर केलेला नाही. ही यंत्रणा हॅक करता येत असल्याने त्यात सुरक्षेला बाधा पोहोचू शकते. त्यामुळे अनेक कंपन्यांचे योजनेतील स्वारस्य संपले आणि त्यांनी निविदा प्रक्रियेतून माघार घेतली. (प्रतिनिधी)