मुंबईकरांनी लुटला पावसाचा आनंद
By Admin | Updated: August 1, 2016 02:10 IST2016-08-01T02:10:18+5:302016-08-01T02:10:18+5:30
मागील आठवड्याभरापासून शहर आणि उपनगरात अधून-मधून कोसळणाऱ्या जलधारांनी रविवारी सकाळी मात्र रौद्र रुप धारण केले.

मुंबईकरांनी लुटला पावसाचा आनंद
मुंबई : मागील आठवड्याभरापासून शहर आणि उपनगरात अधून-मधून कोसळणाऱ्या जलधारांनी रविवारी सकाळी मात्र रौद्र रुप धारण केले. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी आणि दुपारी कोसळलेल्या जलधारांनी मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले असले तरी ऐन रविवारीचा मुहूर्त साधत कोसळलेल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईने चौपाटयांवर केलेल्या गर्दीमुळे मुंबईकरांचा मान्सून आनंद ओसंडून वाहत होता.
रविवारी सकाळी समुद्राला भरती असतानाच मुंबईत पावसाची दमदार हजेरी लागली. जोरदार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर विपरित परिणाम होत असतानाच ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडत होत्या. मात्र असे असतानाच ऐन रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मनमुराद कोसळणाऱ्या पावसात तरुणाई चिंब भिजली.
दुपारनंतर पावसाचा वेग कमी झाल्याने सायंकाळपर्यंत मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटीसह वर्सोव्याच्या समुद्र किनारी पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. समुद्र किनारी उसळणाऱ्या लाटा, वेगाने वाहणारा वारा, पावसाचे टपोरे थेंब; अशा रविवारच्या मुक्त वातावरणाला तरुणाई सामोरे गेली. (प्रतिनिधी)
>सरी झेलण्यास रस्त्यांवर मुक्तसंचार
समुद्राच्या लाटा अंगावर झेलत तरुणांनी गरमागरम चहा, कांदाभजी आणि भुट्टा यासारख्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. मरिन ड्राइव्ह येथे तरुणाईने चिंब भिजण्यासाठी गर्दी केली असतानाच गिरगाव आणि जुहू चौपाटीवर कौटूंबिक गर्दीचा आनंद ओसंडून वाहत होता. समुद्रावर गर्दी वाढत असतानाच शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यात फुटबॉलसह क्रिकेटचा खेळ रंगला होता. तर दुसरीकडे रस्त्यावर पडणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबाना अंगावर झेलण्यासाठी मुंबईकरांचा मुक्तसंचार सुरु होता.
दरम्यान, ऐन रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत मुंबईकरांनी मान्सून पिकनिकचा बेत आखल्याचे चित्र होते. त्यामुळे मुंबईबाहेरील मान्सून पिकनिक स्पॉटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गर्दीला उधाण आले होते. परिणामी शनिवारी रात्रीपासून सुरु झालेला हा मान्सून पिकनिकचा मूड रविवारच्या रात्रीपर्यंत कायम असल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे येत्या ४८ तासांत शहर आणि उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.