मुंबईकर विनापरवाना सुसाट
By Admin | Updated: September 5, 2016 05:08 IST2016-09-05T05:08:06+5:302016-09-05T05:08:06+5:30
विनापरवाना वाहनधारक मुंबईत मोठ्या प्रमाणात धावत असून, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईकर विनापरवाना सुसाट
मुंबई : विनापरवाना वाहनधारक मुंबईत मोठ्या प्रमाणात धावत असून, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विनापरवाना चालकांना आळा बसविण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यामुळे २0१२पासून मोठ्या प्रमाणात केसेसची नोंद होत आहे. आतापर्यंत एकूण ३२ हजार ६८४ केसेस दाखल झाल्या आहेत.
खार येथील पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची नोंद करताना एका अल्पवयीन दुचाकीस्वाराला विलास शिंदे यांनी हटकले. त्यानंतर झालेल्या वादात शिंदे यांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने बरेच प्रश्न उपस्थित झाले. मुळात १६ वर्षांवरील तरुणांना ५0 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी चालवण्याचा परवाना दिला जातो. तर १८ वर्षांवरील तरुणांना अन्य वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येतो. शिंदे यांनी हटकलेल्या तरुणाचे वय हे १७ होते व तो अल्पवयीन होता आणि त्याच्याकडे परवाना नसल्याची बाबही उघड झाली. महत्त्वाची बाब म्हणजे विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांचे मुंबईत प्रमाण अधिक असून, त्याविरोधात वाहतूक पोलिसांनी कंबरही कसली आहे. तरीही त्यांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. २0१२मध्ये ५,३२१ केसेसची नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली होती. त्यानंतरच्या वर्षात हाच आकडा ६ हजार ३0१ एवढा झाला. २0१६च्या जुलै महिन्यापर्यंत तर ५ हजार ४८२ विनापरवाना चालकांची नोंद झाली आहे. यात अल्पवयीन चालकांचेही प्रमाण मोठे असल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. शिंदे यांच्या घटनेची गंभीर दखल घेत आणखी कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)