मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, गारव्याने मुंबईकर सुखावले
By Admin | Updated: May 26, 2016 11:19 IST2016-05-26T09:06:06+5:302016-05-26T11:19:52+5:30
गुरूवारी सकाळी मुंबईसह उपनगरांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना सुखद गारवा अनुभवता आला.

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, गारव्याने मुंबईकर सुखावले
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना गुरूवारी सकाळी आलेल्या अनपेक्षित पावसामुळे सुखद गारव्याचा दिलासा मिळाला. गुरूवारी सकाळी मुंबईसह उपनगरांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातारवणात गारवा आला आहे. दादर, परळ, भायखळा यासह अनेक भागात सकाळी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या असून आणिखी वृष्टीची शक्यता आहे.
दरम्यान यंदा राज्यात सरासरीच्या २५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत. राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे हवामान खात्याने राज्य शासनाला कळविले आहे. हे लक्षात घेता आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या धर्तीवर संबंधित सर्व घटकांशी समन्वय राखून काम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.