‘पॅलेस आॅन व्हिल्स’मध्ये आता मुंबई-शिर्डी सेवा
By Admin | Updated: August 27, 2014 04:17 IST2014-08-27T04:17:40+5:302014-08-27T04:17:40+5:30
पॅलेस आॅन व्हिल्स’ अशी ओळख असणाऱ्या डेक्कन ओडीसीच्या टूरमध्ये आता मुंबई-शिर्डी या नव्या पर्यटनस्थळाची भर पडली आहे.

‘पॅलेस आॅन व्हिल्स’मध्ये आता मुंबई-शिर्डी सेवा
मुंबई : ‘पॅलेस आॅन व्हिल्स’ अशी ओळख असणाऱ्या डेक्कन ओडीसीच्या टूरमध्ये आता मुंबई-शिर्डी या नव्या पर्यटनस्थळाची भर पडली आहे. त्यासह गुजरातचाही समावेश यात करण्यात आला आहे. एमटीडीसीकडून (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) आॅक्टोबर २0१४ पासून ही गाडी चालवण्यात येणार असून त्यासाठी कॉक्स अॅन्ड किंग्ज लिमिटेड आऊटसोर्स पार्टनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत नविन टूरची आणि भागिदाराची माहीती एमटीडीसीकडून देण्यात आली.
२00४ साली राजेशाही थाट असलेली डेक्कन ओडीसी ट्रेन सुरु करण्यात आली. राज्यातील अनेक पर्यटनस्थळांचे दर्शन घडवताना भारतासह जगभरातील पर्यटकांना या ट्रेनने आकर्षित केले आहे. आॅक्टोबर ते एप्रिल-मे पर्यंत धावणारी ही ट्रेन आता २0१४ च्या आॅक्टोबरमध्ये नव्या भागिदारासह सामिल होत आहे. सध्या भारतात पाच डेक्कन ओडीसी असून यात एक ट्रेन महाराष्ट्रासाठी धावते. २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी या ट्रेनकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे सुरुवातीला २५ फेऱ्या होत असतानाच मुंबई हल्ल्यानंतर साधारण १५ फेऱ्याच होऊ लागल्या. पर्यटकांनी फिरवलेली पाठ, डेक्कन ओडीसीचा वाढत जाणारा खर्च यामुळे डेक्कन ओडीसी ट्रेन बंद पडते की काय अशी चर्चा मध्यंतरी रंगली. मात्र एमटीडीसीने ताज कंपनीशी असलेला जुना करार संपताच आता नवीन भागिदारासह ही ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबई-शिर्डी-मुंबई अशी सोल क्वेस्ट ही तीन दिवसाची टूर असणार आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या पर्यटकांचा ओढा पाहता या नविन टूरचा समावेश करण्यात आल्याचे एमटीडीसीच्या महाव्यवस्थापक किशोरी गद्रे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हिडन ट्रेझर्स आॅफ गुजरात अशी आठ दिवस सात रात्रीची नविन टूरही आखण्यात आली असून वडोदरा, पालिठाणा, सासण, गीर,कच्छचे छोटे रण, पाट, अहमदाबाद आणि दिल्लीचे पर्यटन दाखवण्यात येणार आहे.