मुंबई, पुण्याची पोरं हुश्शार!
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30
दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५१ हजार २८१ आहे

मुंबई, पुण्याची पोरं हुश्शार!
पुणे : दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५१ हजार २८१ आहे. परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचा विचार करता, ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या राज्यातील नियमित विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ३ हजार ७९४ आहे. त्यातही मुंबई व पुण्याच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी अर्थात, ७५ टक्के व त्या पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.
दहावी-बारावीमध्ये उत्तीर्णांचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने शासनाने ८०/२० पॅटर्न स्वीकारला. त्यातही मंडळाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यासाठी १५ ग्रेस गुणांचा लाभ दिला जातो. त्यामुळे गेल्या
काही वर्षांपासून दहावीचा निकाल फुगलेला दिसत आहे.
यंदा मुंबई विभागातील ८५
हजार १२३ विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळविली आहे,
तसेच १ लाख ९ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त
केली आहे.
राज्यात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (६० टक्के) झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख ६१ हजार ७८६ असून, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले (४५ टक्के) विद्यार्थी ३ लाख ९४ हजार ४५ आहेत, तसेच ३५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७४ हजार ५१८ आहे. (प्रतिनिधी)
निकालाबरोबरच कलअहवाल
विद्यार्थ्यांमध्ये दहावीनंतर कोणती शाखा अथवा कोणता अभ्यासक्रम निवडावा याबाबत संभ्रम असतो. तो दूर करण्यासाठी या वर्षी शालेय शिक्षण विभागाने दहावीला बसलेल्या १५ लाख ६२ हजार २४८ विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली. त्याचा अहवाल यापूर्वीच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता हा अहवाल विद्यार्थ्यांना १५ जूनला दहावीच्या गुणपत्रिकेबरोबर संंबंधित शाळेत दिला जाणार आहे.
श्रेणीसुधारची संधी
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना त्यांचे गुण किंवा श्रेणी सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार योजनेंतर्गत पुन्हा परीक्षा देता येईल. एकाच वेळी सर्व विषय घेऊन बसलेल्या व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै-आॅगस्ट २०१६ व मार्च २०१७च्या परीक्षेसाठी संधी देण्यात येतात.