मुंबईत घराच्या किंमती लवकरच कमी होणार
By Admin | Updated: January 6, 2016 13:15 IST2016-01-06T13:15:24+5:302016-01-06T13:15:24+5:30
तुम्ही नवीन घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गृहनिर्माण क्षेत्रासंबंधी सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयांमुळे घराच्या किंमती आणखी कमी होणार आहेत.

मुंबईत घराच्या किंमती लवकरच कमी होणार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - तुम्ही नवीन घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गृहनिर्माण क्षेत्रासंबंधी सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयांमुळे घराच्या किंमती आणखी कमी होणार आहेत. गृहखरेदीदारांना विकासकाकडून घराच्या खरेदीवर आणखी २० टक्के सवलत लवकरच मिळू शकते.
इमारत बांधणीसाठी आवश्यक परवानग्यांची संख्या आता कमी झाली आहे तसेच फाईल पास करण्यासाठी ६० दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गृहबांधणीचे दर कमी होणार आहेत. कमी आणि वेगवान परवानग्यांमुळे इमारत बांधणीचा अंदाजित खर्च ३० टक्क्याने कमी होणार आहे. कमी झालेल्या खर्चाचा २० टक्के सवलतीच्या रुपाने ग्राहकांना फायदा पोहोचवण्याची विकासकाची योजना आहे.
महापालिकेच्या इमारत परवानगी विभागासोबत काम केलेल्या एका वरिष्ठ वास्तूविशारदाने दिलेल्या माहितीनुसार विकासक प्रत्येक स्कवेअर फूट परवानगीसाठी एक हजार रुपये खर्च करायचे, आता परवानग्या कमी झाल्यामुळे प्रत्येक स्कवेअर फुटचा खर्च ७०० ते ८०० रुपये झाला आहे. या कमी झालेल्या खर्चाचा फायदा गृहखरेदीदारांना मिळणार आहे.