लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने संपूर्ण मुंबईतील कबुतरखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही लोकांच्या दबावामुळे पालिकेने मुलुंडसह आणखी तीन ठिकाणी नवीन कबुतरखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात अॅड. सागर देवरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कबुतरखान्याविरोधात त्यांनी मूळ प्रकरणात इंटरव्हेनशन याचिका दाखल केली असून, लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.
पालिकेने वरळी जलाशय परिसर, अंधेरीतील लोखंडवाला बैंक रोड जवळचा खारफुटी परिसर, जुना ऐरोली-मुलुंड जकात नाका, आणि बोरिवलीतील गोराई मैदान येथे कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय घेण्यात आला आहे. तेथे सकाळी ७ ते ९ दरम्यान कबुतरांना दाणे टाकता येणार आहेत.
ऐरोली-मुलुंड लिंक रोड अत्यंत व्यस्त
मुलुंडमधील कबुतरखान्याचे प्रस्तावित ठिकाण हा वादाचा मुख्य मुद्दा आहे. ऐरोली-मुलुंड लिंक रोड हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अत्यंत व्यस्त मार्ग आहे. तेथे कबुतरखाना उभारल्यास मोठ्या प्रमाणात पक्षी गोळा होतील. कबुतरांचे थवे, त्यांची अचानक उड्डाणे, तसेच रस्त्याच्या कडेने खाद्य देण्यासाठी जमणारे नागरिक, यामुळे वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढेल, असे मत देवरे यांनी मांडले आहे.
कबुतरांच्या विष्ठेमध्ये आजारांचे जंतू
कबुतरांच्या विष्ठेमध्ये हिस्टोप्लाज्मोसिस, क्रिप्टोकोकस यांसारख्या आजारांचे जंतू असतात, त्यामुळे श्वसनविकार आणि फुप्फुसांशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात. पालिकेने केलेल्या अभ्यासातही कबुतरखान्यांमुळे आजूबाजूच्या परिसरात आरोग्याचा धोका वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सार्वजनिक खुल्या जागेत मर्यादित वेळेसाठी जरी कबुतरांना खाद्य दिले तरी कालांतराने आसपासच्या परिसरात हे आरोग्य धोके पसरू शकतात, असेही देवरे यांनी याचिकेत म्हटले आहे.
'फ्लेमिंगो'च्या वास्तव्याला धक्का?
मुलुंड परिसरात फ्लेमिंगो झोन असून, तेथील कांदळवनात दरवर्षी हिवाळ्यात हजारो फ्लेमिंगो पक्षी येतात. या संवेदनशील पक्षी प्रजातींसाठी शांत आणि संतुलित पर्यावरण आवश्यक असते. तेव्हा जवळच कबुतरखाना सुरू केल्यास 3 मानवनिर्मित गर्दी, गोंगाट, आणि खाद्य टाकल्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे फ्लेमिंगोंची स्थलांतर प्रक्रिया आणि निवासावर परिणाम होण्याची शक्यता देवरे यांनी व्यक्त केली.
Web Summary : Facing pressure, Mumbai's municipality approved three new pigeon houses, despite health and environmental concerns. A lawyer challenged this decision in court, citing health risks from pigeon droppings, potential harm to migratory flamingos, and traffic hazards.
Web Summary : मुंबई नगर पालिका ने दबाव में कबूतरखानों को मंजूरी दी, जिसका विरोध हो रहा है। वकील ने अदालत में चुनौती दी, कबूतरों से स्वास्थ्य जोखिम, फ्लेमिंगो को खतरा और यातायात समस्या बताई।