मुंबईला ‘निलोफर’चा धोका नाही; मात्र पाऊस पडणार !
By Admin | Updated: October 28, 2014 01:46 IST2014-10-28T01:46:00+5:302014-10-28T01:46:00+5:30
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निलोफर या चक्रीवादळाचा मुंबईसह राज्याला धोका नसल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

मुंबईला ‘निलोफर’चा धोका नाही; मात्र पाऊस पडणार !
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निलोफर या चक्रीवादळाचा मुंबईसह राज्याला धोका नसल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र हेच सांगताना पुढील चार दिवस निलोफरचा विपरीत परिणाम म्हणून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी जलधारा कोसळतील, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे रूपांतर चक्रीवादळात झाले असून, पुढील 24 तासांत या चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या किनारपट्टीर्पयत होईल आणि त्यानंतर ते आखातच्या दिशेने पुढे सरकेल, असे हवामान खात्याच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. शिवाय मुंबई आणि महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा धोका नसला तरी पुढील चार दिवस राज्यासह मुंबईवर ढगांचे साम्राज्य कायम राहील आणि रिमङिाम धारा बरसतील.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मराठवाडय़ात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोकण आणि गोव्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या
काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेच किंचित घट झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)