मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास नाहीच - राज ठाकरे
By Admin | Updated: March 9, 2015 20:25 IST2015-03-09T20:18:50+5:302015-03-09T20:25:28+5:30
मुंबईचा विकास आराखडा म्हणजे मराठी माणसाला मुंबईबाहेर काढण्याचा कट असून मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास होऊ देणार नाही असा इशारा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास नाहीच - राज ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - मुंबईचा विकास आराखडा म्हणजे मराठी माणसाला मुंबईबाहेर काढण्याचा कट असून मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास होऊ देणार नाही असा इशारा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. आरए व गिरगावातील विकास प्रकल्पांना मनसेचा विरोध कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
मनसेचा आज नववा वर्धापन दिन असून यानिमित्त मुंबई एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विकास आराखड्यावर सडकून टीका केली. मराठी माणूस राहत असलेल्या आरए, गिरगाव या भागांमधूनच मेट्रोचा मार्ग नेण्यात आला, मलबार हिलसारख्या भागातून मेट्रोचा मार्ग नेण्याची हिंमत दाखवली जाईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्या महाराष्ट्र इंच इंच विकू असा नारा दिला जात असून मराठी माणसाच्या रक्षणासाठी कार्यकर्त्यांनी सदैव जागरुक राहावे, दरवेळी माझ्या आदेशाची वाट बघू नये असे त्यांनी सांगितले.
मी पराभवांना घाबरत नाही, पराभव झाल्यास मी पुन्हा जिंकण्याची तयारी करतो असे सांगत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मनसेचा जन्म निवडणुकीसाठी नव्हे तर मराठी माणसासाठी झाला आहे असेही नमूद केले.