मुंबई - नाशिक महामार्ग ठप्प
By Admin | Updated: July 31, 2014 04:06 IST2014-07-31T04:06:54+5:302014-07-31T04:06:54+5:30
मुंबई-नाशिक मार्गावरील रेल्वे व महामार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुमारे चार तास विस्कळीत झाली होती.

मुंबई - नाशिक महामार्ग ठप्प
कसारा : मुंबई-नाशिक मार्गावरील रेल्वे व महामार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुमारे चार तास विस्कळीत झाली होती.
बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कसारा घाटात दरड कोसळली होती. ही घटना इतकी भयानक होती की, संपूर्ण दरड घाटातील रस्त्यावर पसरली होती. बिबळवाडी वळणावर दगड, माती, असलेली महाकाय दरड नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोवर कोसळली़ सुदैवाने टेम्पोचालकाने उडी मारल्याने तो बचावला. सकाळी ८ वाजता दरड कोसळल्यानंतर कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यशवंत सोलसे, अक्षय सोनवणे, के. जी. घोसाळकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली. दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने महामार्गावरील नवीन कसारा घाटातील वाहतूक बंद करून जुन्या कसारा घाटमार्गे वळवण्यात आली़
दरम्यान, मुसळधार पाऊस असल्याने नवीन कसारा घाटातील दरड हटवण्यात व्यत्यय येत होता. गॅमन इंडिया या ठेकेदार कंपनीकडे जेसीबी, क्रेन, डम्पर यासारख्या आपत्कालीन योजनेचे साहित्य उपलब्ध नसल्याने पोलिसांनी खासगी क्रेन व जेसीबी बोलवून दरड हटवण्याचे काम सुरू केले. नवीन घाटातील दरड हटवण्याचे काम सुरू असतानाच जुन्या घाटात अप-डाऊन एकेरी वाहतूक सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्याच वेळी मुंबई-नाशिक मार्गावर जुन्या कसारा घाटातही महाकाय वृक्ष व दरड एका ट्रेलरवर पडल्याने जुन्या घाटातील वाहतूकही सुमारे एक तास ठप्प झाली होती. सकाळी ८ पासून दुपारी १२ वाजेपर्यंत कसारा घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. कसारा पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी आपल्या २५ कर्मचाऱ्यांसह वाहतूक सुरळीत करण्याचे व दरड हटवण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने करत होते.
दुपारी १२.३० च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, महामार्गाचा ठेका घेतलेल्या गॅमन इंडिया या कंपनीने कसारा घाटात कुठल्याही प्रकारची आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित न केल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. (प्रतिनिधी)