ठाण्यातील १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली १७ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर मुलाविरोधात पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता कायद्याच्या संबंधित कलमांखाली आरोप दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ठाण्यातील भिवंडी परिसरात राहते आणि मुलुंडमधील एका महाविद्यालयात शिकते. आरोपी मुलाने तिच्याशी मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान मुलाने मुलुंड पूर्वेतील एका बागेत आणि रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या मागे मुलीवर अत्याचार केले, असे पीडिताच्या पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले.
पीडिताची कळवा येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी ती दोन आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. तिच्या जबाबावरून नवघर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ६४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम १२, ४ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी मुलाला अटक करून डोंगरी बालगृहात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.