मुंबई: पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त सीट उपलब्ध होणार असून यासाठी ५.४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये गाडीतील १ लगेज डबा ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात रूपांतरित करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही व्यवस्था रेल्वेकडून करण्यात येत आहे.
लोकल गाड्यांमध्ये दररोज सुमारे ५०,००० ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असून, रेल्वेने ज्येष्ठांना लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित डब्यांची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
कामासाठी निविदाही जारी सध्या पश्चिम रेल्वेच्या लोकलध्ये १४ जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आहेत. चर्चगेट टोकापासून तिसऱ्या आणि १२ व्या कोचमध्ये या जागा राखीव आहेत. परंतु, गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना तेथपर्यंत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे रेल्वे बोर्डाने सामानाच्या डब्याचे (चर्चगेट टोकापासून ७ वा कोच) समर्पित ज्येष्ठ नागरिक डब्यात रूपांतरास मान्यता दिली आहे. याची निविदा जारी केल्या आहेत.
१०५ लोकलमध्ये सुविधासंबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, या डब्यामध्ये १३ प्रवाशांची बसण्याची क्षमता आणि ९१ प्रवाशांसाठी उभे राहण्याची जागा असेल. सहजपणे चढ-उतार करता यावे, यासाठी स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन पॉइंट असतील. तथापि, इतर लगेज डबे कायम ठेवले जातील. हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार असून, एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हे बदल १०५ नॉन एसी ईएमयू रेकमध्ये केले जातील.
पश्चिम रेल्वेचे अधिकारी काय म्हणाले?ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वे येत्या काळात टप्प्याटप्प्याने १०५ रेकमधील १ सामानांचा डबा ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात रूपांतरित करणार आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास आरामदायी होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.