मुंबई गेली खड्ड्यात
By Admin | Updated: July 2, 2016 05:07 IST2016-07-02T05:07:15+5:302016-07-02T05:07:15+5:30
गेले चार-पाच दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

मुंबई गेली खड्ड्यात
गेले चार-पाच दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गेल्या दोन दिवसांतच दीडशेहून अधिक खड्डे मुंबईतील रस्त्यांवर पडले आहेत़ यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून, वाहतूककोंडीही होत आहे़ मात्र उघडीप मिळाल्यानंतरच हे खड्डे बुजविणे पालिकेला शक्य होणार आहे़ तोपर्यंत मुंबईकरांचा प्रवास खडतर राहणार आहे़
यंदा मान्सून मुंबईत उशिराच दाखल झाला़ मात्र पालिकेला या काळात खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदारच मिळालेले नाहीत़ त्यामुळे खराब रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांकडूनच खड्डे बुजविण्याचे काम करून घेण्यात येत आहे़ त्यातच मुसळधार पावसामुळे मुंबई आणखी खड्ड्यात गेली आहे़ २० जूनपासून १८८ तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत़
यापैकी १३२ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे; तर ५६ खड्डे बुजविण्यासाठी पावसाने उसंत दिलेली नाही़ त्यातच गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे़ या काळात दीडशे नवीन खड्ड्यांची भर पडली आहे़ पावसाने उघडीप दिली तरच हे खड्डे बुजविणे शक्य होईल, असा बचाव आता पालिका अधिकारी करीत आहेत़
>खड्ड्यांच्या तक्रारी व डागडुजी
२० जूनपासून १८८ तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या़ यापैकी १३२ खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले़ तर ५६ खड्ड्यांचे काम शिल्लक आहे़ त्यातच पावसाने नवीन दीडशे खड्डे वाढविले आहेत़ या २०६ खड्ड्यांपैकी १४० खड्डे बुजविल्याचे, उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले़
>करोडो रुपये खड्ड्यांत
मार्च महिन्यात पालिकेने खराब रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी सात परिमंडळांत प्रत्येकी एक ठेकेदार नेमला़ पावसाळ्यापूर्वी २९ कोटी रुपयांचे कंत्राट पालिकेने दिले आहे़ तर पावसाळ्यामध्ये खड्डे बुजविण्यासाठी १७ कोटी असे ४६ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत़
>तक्रारींसाठी नवे अॅप
२०११मध्ये पालिकेने वाईज आॅफ सिटिझन हे संकेतस्थळ सुुरू केले़ मात्र या संकेतस्थळाचे कंत्राट संपल्यामुळे आता नवीन अॅप पालिकेने आणले आहे़ ेूॅे 247 याद्वारे नागरिक आपल्या वॉर्डातील खड्ड्यांच्या तक्रारी करू शकतात; तसेच १९१६ हा क्रमांकही उपलब्ध आहे़
>वाहतूककोंडी
हिंदमाता उड्डाणपूल, अंधेरी उड्डाणपूल, पश्चिम द्रुतगती महामार्ग कांदिवली, सायन पूर्व द्रुतगती महामार्ग, माहीम कॉजवे जंक्शन, ओशिवरा लिंक रोड, सहार रोड अंधेरी, पी डिमेलो रोड़