मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक

By Admin | Updated: May 14, 2015 02:11 IST2015-05-14T02:11:16+5:302015-05-14T02:11:16+5:30

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. सुकेळी येथे दोन सख्ख्या भावांचा अपघातात बळी गेल्याचे वृत्त ताजे असतानाच

Mumbai-Goa highway is dangerous | मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक

मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक

रोहा : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. सुकेळी येथे दोन सख्ख्या भावांचा अपघातात बळी गेल्याचे वृत्त ताजे असतानाच बुधवारी कोलाड जवळील बरसगावच्या हद्दीत स्वीफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने जात विरूध्द दिशेने येणाऱ्या टँकरवर आदळली. या अपघातात एक प्रवासी ठार तर चार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत कोलाड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजताच्या सुमारास दापोलीहून मुंबई बोरीवलीकडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार मुंबईहून येत असलेल्या टँकरवर जोरदार आदळल्याने झालेल्या अपघातात हर्षदा अरूण मेंगाणे, प्रियंका अरूण मेंमाणे, अरूण अर्जून मेंगाणे, अमिता अरूण मेंमाणे, मिलिंद राम शिवे (सर्व राहणार बोरिवली ) हे प्रवासी जखमी झाले आहेत. हे सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी रोहे येथील शासकीय रु ग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे एकही डॉक्टरच उपलब्ध नसल्याने या जखमी प्रवाशांचे हाल झाले. म्हणून त्यांना पुढील उपचारार्थ पनवेलच्या एमजीएम हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले.
या अपघातात स्वीफ्ट डिझायर कार आपला मार्ग सोडून विरूध्द दिशेने येणाऱ्या टँकरवर आदळल्याने कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अपघाताचे वृत्त समजताच कोलाड पोलीस स्टेशन, कोलाड वाहतूक शाखेने घटनास्थळी धाव घेतली.
या अपघाताची अधिक चौकशी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दररोज घडणाऱ्या अपघातांमुळे सुरक्षितता धोक्यात आली असून महामार्गाच्या रूंदीकरणारचे काम कधी पूर्ण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या महामार्गावर दिवसेगणिक घडणारे अपघात पाहता निष्पाप नागरिकांना प्राणाला मुकावे लागत असल्याने सर्वत्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Mumbai-Goa highway is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.