मुंबईत भाजपाचा परप्रांतीय नेत्यांवर भर
By Admin | Updated: October 12, 2014 02:46 IST2014-10-12T02:46:57+5:302014-10-12T02:46:57+5:30
मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील परप्रांतीय मते भाजपाकडे पक्षाने आखली आहे. शिवसेनेसोबतची गेल्या 25 वर्षाची युती भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशावरून तोडली.

मुंबईत भाजपाचा परप्रांतीय नेत्यांवर भर
>मुंबई : मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील परप्रांतीय मते भाजपाकडे पक्षाने आखली आहे. शिवसेनेसोबतची गेल्या 25 वर्षाची युती भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशावरून तोडली. अमित शहा यांना मुंबईवर कब्जा करायचा असल्याने भाजपाने हे कृत्य केले, असा प्रचार सुरु आहे. त्याचा मराठी माणसावर किती प्रभाव पडला आहे याचा भाजपाला अंदाज येत नसल्याने परप्रांतातून नेते आणून त्यांना प्रचारात उतरवण्याचा सपाटा लावला आहे. वसुंधराराजे सिंधिया, आनंदीबेन पटेल, सुषमा स्वराज, येड्डीयुरप्पा, मनोहर र्पीकर, सुशील मोदी असे नेते सध्या मुंबई व परिसरात प्रचार करीत आहेत. वसुंधराराजे मारवाडी, आनंदीबेन गुजराती, येड्डीयुरप्पा कानडी, सुशील मोदी बिहारी मतांकरिता प्रयत्न करीत आहेत.
भाजपाने आपल्या गुजरातमधील सर्व आमदारांना मतदानाच्या दिवशी मुंबईत राहुन गुजराती मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे फर्मान काढले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील भाजपाचे काही बाहुबली नेते मतदानाच्या दिवशी मुंबईत येतील व शिवसेनेकडून भाजपा मतदारबहुल विभागात दहशत बसवण्याचा प्रयत्न झाला तर त्यास आडकाठी करणार असल्याचे कळते. कुठल्याही परिस्थितीत साम, दाम, दंड, भेद या मार्गाचा वापर करून मुंबईत यश मिळविण्याचे भाजपाने ठरवले आहे. भाजपाने परप्रांतीय नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने मतदानाच्या तोंडावर मुंबईत गुजराती विरुद्ध मराठी असा भाषिक वाद निर्माण होऊ शकतो आणि शिवसैनिकांकडून आक्रमक प्रतिक्रिया रस्त्यावर उमटू शकते, अशी भीती राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. (विशेष प्रतिनिधी)