मुंबई काँग्रेसचे भांडण दिल्लीदरबारी
By Admin | Updated: August 22, 2015 01:30 IST2015-08-22T01:30:26+5:302015-08-22T01:30:26+5:30
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच्यातील शीतयुद्ध थांबवा, असे साकडे प्रदेश काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी थेट काँग्रेसचे

मुंबई काँग्रेसचे भांडण दिल्लीदरबारी
अतुल कुलकर्णी, मुंबई
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांच्यातील शीतयुद्ध थांबवा, असे साकडे प्रदेश काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी थेट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना घातले आहे. आपापसांतल्या भांडणात मुंबईत पक्षच शिल्लक राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली असल्याचे समजते.
राजीव गांधी पुण्यतिथी दिनाच्या दिवशीच दोन नेत्यांमधली दुफळी उघडपणे पाहायला मिळाली. निरुपम यांनी जाहीर केलेल्या मोटारसायकल रॅलीकडे पूर्णपणे पाठ फिरवत कामत सकाळी जाऊन राजीव गांधींना पुष्पांजली अर्पण करून आले. त्यानंतर एक तासाने निरुपम आणि अन्य आमदार मोटारसायकल रॅलीने तेथे आले. माजी मंत्री नसीम खान यांनीही रॅलीकडे पाठ फिरवली.
निरुपम यांनी मुंबई काँग्रेसच्या बॅनरवर केवळ उत्तर भारतीयांचे मेळावे घेणे सुरू केले, याआधी तसे कधीही घडले नव्हते असा दावा एक गट करत असताना कामत गट कामच करू देत नाही, असा आक्षेप निरुपम गटातर्फे घेतला जात आहे. दिल्लीत राहुल गांधींकडे याबाबत चर्चा
झाली. मराठी माणूस शिवसेनेसोबत जातो, कोकणातला माणूसदेखील पोटनिवडणुकीत जर नारायण राणे यांच्या सोबत उभा राहिला नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांचे नेतृत्व कसे स्वीकारणार, असा युक्तीवादही गांधींना ऐकवण्यात आला. गुजराती मतं भाजपाची साथ सोडणार नाहीत, मुस्लीम मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएम आहेच. दक्षिण भारतीय मतदार उमेदवार पाहून निर्णय घेईल. तर उत्तर भारतीय मतदार देखील पूर्णत: काँग्रेससोबत नाही. मतदारांची ही फाटाफूट आहे आणि २२७ नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ५२ नगरसेवक असूनही त्यांनी एकत्र येऊन कधी महापालिका दणाणून सोडल्याचे उदाहरण औषधाला सुध्दा नाही.
हेच चित्र कायम राहिले तर मुंबई महापालिकेत अवघ्या पंधरा जागा येणे देखील अवघड होऊन बसेल, अशा स्पष्ट शब्दात खा. गांधींना परिस्थिती सांगण्यात आल्याचे समजते. निरुपम यांच्या आधी जनार्दन चांदूरकर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. पण त्यांच्या काळात पक्ष चर्चेत नव्हता, पण त्याआधी कृपाशंकर सिंह अध्यक्षपदी असताना त्यांनी सतत कार्यक्रम घेऊन पक्ष संघटनेत चैतन्य आणले. परंतु त्यांनाही कामत यांनी काम करु दिले नाही. आता निरुपम यांच्या बाबतीतही तेच होत आहे, असा दावा निरुपम समर्थकांचा आहे.
मराठी माणूस सेनेसोबत जातो, कोकणातला माणूस पोटनिवडणुकीत नारायण राणे यांच्यासोबत उभा राहिला नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांचे नेतृत्व कसे स्वीकारणार, असेही गांधींना सांगण्यात आले.
माझी लढाई भाजपा-शिवसेनेसोबत आहे. आमच्यात काही मतभेद असतील तर आपापसांत बसवून ते मिटवले पाहिजेत. काही चुकत असेल तर सांगितले पाहिजे. आज आम्ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेच्या बाहेर फेकले गेलो आहोत याची जाणीव ठेवून सगळ्यांनी झोकून देऊन काम केले पाहिजे. पण कोणी त्यात व्यक्तिगत स्वार्थाला महत्त्व देत असेल तर त्याला मी काय करणार?
- संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष