मुंबईत पुन्हा दोन पोलिसांवर हल्ले

By Admin | Updated: September 2, 2016 01:31 IST2016-09-02T01:31:02+5:302016-09-02T01:31:02+5:30

कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतरही मुंबईत पोलिसांवरील हल्ले सुरूच आहेत. कुलाब्यात गाडी अडवणाऱ्या पोलिसावर माजी नगरसेवकाने

Mumbai attacks again on two policemen | मुंबईत पुन्हा दोन पोलिसांवर हल्ले

मुंबईत पुन्हा दोन पोलिसांवर हल्ले

मुंबई : कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतरही मुंबईत पोलिसांवरील हल्ले सुरूच आहेत. कुलाब्यात गाडी अडवणाऱ्या पोलिसावर माजी नगरसेवकाने हल्ला केला, तर कुर्ला येथे नाकाबंदीच्या वेळी गाडी अडवल्यानंतर पोलीस हवालदाराला धडक देण्याचा प्रकार घडला.
गेटवे आॅफ इंडिया परिसरात वाहतूक पोलीस राजेंद्र पवार (४५) हे कर्तव्य बजावत होते. दुपारी तीनच्या सुमारास स्विफ्ट डिझायरमधील चालक फोनवर बोलत कार चालवित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गाडी थांबवून कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा गाडीत बसलेले माजी नगरसेवक राजेंद्र लोहिया यांनी गाडीबाहेर उतरत, त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पाठोपाठ त्यांचे १० ते १२ बॉडीगार्ड, कार्यकर्ते गाडीबाहेर उतरून पवारना घेरले. ही परिस्थिती बघून मुंबईकर त्यांच्या मदतीला धावून आले. नागरिकांनी पोलिसांना लगेचच ही माहिती दिली. कुलाबा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत, पोलीस ठाण्यात नेले. मुंबईकरांमुळेत आपण बचावलो, असे पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तपासात नगरसेवक विनापरवाना गाडी चालवित असल्याचे समोर आले आहे.
चालक अहमद खानला अटक झाली.
कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार पोलीस चौकीजवळ नाकाबंदी सुरू असताना पोलीस हवालदार देविदास निंबाळकर यांनी मोटारसायकलस्वाराला थांबण्यासाठी इशारा केला. त्याने गाडी न थांबविता निंबाळकरांच्या अंगावर गाडी घालून पळ काढला. निंबाळकर यांच्यासोबत असलेल्या अन्य सहकारी पोलिसांनी पाठलाग करून इम्तियाज खानला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

काम करायचे की नाही...
कुलाबा येथील हल्ल्यात जखमी झालेले वाहतूक पोलीस पवार यांच्या म्हणण्यानुसार, वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी आम्ही नियम पाळण्याचे आवाहन करतो. मात्र, त्यांच्या चुकीच्या मानसिकतेमुळे असले प्रकार सुरू आहेत. अशा वेळी आम्ही कायद्याने काम करायचे की नाही? असा प्रश्न पडत असल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. हे प्रकार या पुढे तरी थांबावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वरिष्ठांच्या दबावातून फक्त एनसीची नोंद
पोलीस दलात शिंदे यांचे प्रकरण समोर असतानाही वरिष्ठांच्या दबावातून अंगावर गाडी घालूनदेखील केवळ एनसीची नोंद करण्याचा प्रताप व्ही.बी. नगर पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आमचेच अधिकारी असे करत असतील, तर आम्ही जीव धोक्यात घालून काम का करावे, अशी संतप्त प्रतिक्रि या पोलीस दलातून उमटत आहेत. त्यात जखमी निंबाळकर यांनाही परस्पर डिस्चार्ज घेण्याची घाईही झाल्याची चर्चा व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात होत आहे.

Web Title: Mumbai attacks again on two policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.