मुंबई @ ३६.१; शुक्रवार उष्ण दिवस राहणार
By Admin | Updated: April 29, 2016 06:01 IST2016-04-29T06:01:52+5:302016-04-29T06:01:52+5:30
बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले असतानाच गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३६.१ अंश नोंदवण्यात आले आहे

मुंबई @ ३६.१; शुक्रवार उष्ण दिवस राहणार
मुंबई : बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले असतानाच गुरुवारी शहराचे कमाल तापमान ३६.१ अंश नोंदवण्यात आले आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मुंबईच्या कमाल तापमानात २ अंशांची घसरण झाली असली तरी उकाडा कायम राहिल्याने मुंबईकर त्रस्त झाले होते. तापमानात चढ-उतार नोंदवण्यात येत असतानाच आता शुक्रवार (२९ एप्रिल) हा ‘उष्ण दिवस’ राहील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाचा पारा मुंबईकरांना आणखी चटके देईल.
राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत असून, आता मुंबईच्या कमाल तापमानानेही ३८ अंशावर मजल मारली आहे. त्यामुळे वाढता उन्हाळा मुंबईकरांना नकोसा झाला असून, मुंबईकरांच्या शरीराहून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत. बुधवारपासून सलग मुंबईचे तापमान वाढत असून, ३८ ते ३६ अंशादरम्यान कमाल तापमानाची नोंद होत आहे. शिवाय तापदायक ऊन, वाढता उकाडा, उष्ण वारे व वाढती आर्द्रता मुंबईकरांचा अधिकाधिक घाम काढत असून, दुपारी ४ वाजेपर्यंत पडणारे रखरखते ऊन तापदायक ठरते आहे.
अरबी समुद्रावरून मुंबईकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. वारे स्थिर होण्यास दुपार होत असल्याने ते तप्त होत आहेत. आर्द्रतेमध्ये चढ-उतार नोंदवण्यात येत आहे. उत्तरेकडील उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदवण्यात येत असून, पुढील ४८ तासांसाठी मुंबईत अशीच परिस्थिती राहील, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले.
>२४ तासांत मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली.२९ ते ३० एप्रिल या काळात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २९ ते ३० एप्रिल या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.