मुंबई १३ अंशावर !
By Admin | Updated: January 13, 2015 04:58 IST2015-01-13T04:58:26+5:302015-01-13T04:58:26+5:30
जानेवारीच्या १ तारखेपासून मुंबईच्या किमान तापमानात सातत्याने चढउतार नोंदविण्यात येत असून, हे किमान तापमान अद्याप २० अंशांवर चढलेले नाही

मुंबई १३ अंशावर !
मुंबई : जानेवारीच्या १ तारखेपासून मुंबईच्या किमान तापमानात सातत्याने चढउतार नोंदविण्यात येत असून, हे किमान तापमान अद्याप २० अंशांवर चढलेले नाही. परिणामी किमान तापमान खालावल्याने मुंबईकर चांगलेच गारठले असून, सोमवारी पुन्हा शहराचा किमान तापमानाचा पारा १३ अंशांवर पोहोचल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली. सोमवारी नोंदविण्यात आलेले हे किमान तापमान या महिन्यात दुसऱ्यांदा नोंदविण्यात आलेले कमी तापमान आहे. ८ जानेवारी रोजी या महिन्यात पहिल्यांदा १३ अंश एवढे कमी तापमान नोंदविण्यात आले होते.
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने गेल्या तीन दिवसांपासून राज्य कमालीचे गारठले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट पसरल्याने येथील जिल्हे थंडीने गारठून गेले आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे नोंदविले आहे. शिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत थंडीची लाट कायम आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. (प्रतिनिधी)