मुळशीत एसटी, पीएमपीएलची सेवा विस्कळीत
By Admin | Updated: August 1, 2016 01:51 IST2016-08-01T01:51:58+5:302016-08-01T01:51:58+5:30
मुळशी तालुक्यात पुणे शहरातून होत असलेली एसटी व पीएमपीएलची सेवा विस्कळीत सुरू आहे.

मुळशीत एसटी, पीएमपीएलची सेवा विस्कळीत
पुणे : मुळशी तालुक्यात पुणे शहरातून होत असलेली एसटी व पीएमपीएलची सेवा विस्कळीत सुरू आहे. गाडीत माणसांना जनावरांसारखा कोंबून प्रवास करावा लागतो. अनियमित फेऱ्या, मोडकळीस आलेल्या गाड्या पाठविल्या जातात. त्यामुळे येथून दररोज शहरात येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
गाड्यांच्या नियमित फेऱ्या कराव्यात व चांगल्या गाड्या देण्याची मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुळशी तालुका हा डोंगरी व दुर्गम आहे. सामान्य माणसाला एसटी व पीएमपीएलशिवाय दुसरा पर्याय नाही. अनेक प्रवाशांना रात्रीच्या गाड्या रद्द करण्यात येत असल्यामुळे पौड एसटी स्थानकात रात्र काढावी लागते. गाडीत जागा नसल्याने अक्षरश: कोंबून बसविले जाते. दूध व्यावसायकिांनाही मोठा त्रास होत आहे. कामगारांनाही वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे प्रवासीवर्गात संताप आहे. खिळखिळ्या झालेल्या गाड्या पाठविल्या जातात. त्यामुळे वारंवार त्या बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रास होत असतो.
पीएमपीएलची सेवाही अनियमित सुरू आहे. नादुरुस्त बस पाठविल्या जात असल्याने वारंवार बस जागोजागी बंद पडलेल्या असतात. त्यामुळे एसटी व पीएमपीएल प्रशासनाला निवेदन दिले असून सेवा सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे. तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे, जिल्हा दूध संघाचे संचालक रामभाऊ ठोंबरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास पायगुडे, महिला अध्यक्षा चंदा केदारी व विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सागर धुमाळ यांनी दिला आहे.
(प्रतिनिधी)
>विद्यार्थ्यांना फटका
मुळशी तालुक्यातून शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. त्यांना वेळेवर व पुरेशा बस उपलब्ध होत नसल्याने वेळेवर पोहोचता येत नाही. कधी गाडी बंद पडली की त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सुनील चांदेरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.