मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरेंमुळे काँग्रेसचे नुकसान!
By Admin | Updated: October 12, 2014 01:17 IST2014-10-12T01:17:43+5:302014-10-12T01:17:43+5:30
राज्यात ७0/८0 उमेदवारांना चुकीच्या पद्धतीने तिकीट; माजी आमदार बबनराव चौधरी यांचा आरोप.

मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरेंमुळे काँग्रेसचे नुकसान!
अकोला : विधानसभा निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक हे पक्षाचे नुकसान करीत असल्याचा आरोप माजी आमदार बबनराव चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपाकरिता इच्छुकांपैकी प्रमुख तीन जणांचे पॅनल काँग्रेसने तयार केले होते. निवड मंडळाने निवडलेल्या या नावांमध्ये काही नेत्यांनी हस्तक्षेप करून नवीन नावे टाकली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एकाकी पाडून चुकीच्या पद्धतीने तिकिटांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी माणिकराव ठाकरे आणि मुकुल वासनिक हे दोन्ही नेते जबाबदार असल्याचा आरोप करून, त्यांना ताबडतोब पदावरून दूर करण्याची मागणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याकडे करण्यात आली असल्याचे चौधरी यांनी सांगितले. बुलडाणा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात वासनिक यांची पूर्ण टीम काम करीत आहे. विरोधात काम करणार्यांना वासनिक हेलीकॉप्टरमधून घेऊन फिरत असल्याचा घणाघाती आरोपही चौधरी यांनी केला. अकोला महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत काँग्रेसचे अब्दुल जब्बार यांना पाडणार्या महिलेस पक्षाने उमेदवारी दिली. राज्यात महिला उमेदवारालाच उमेदवारी द्यायची होती, तर यवतमाळच्या महिला आमदारास डावलून माणिकराव ठाकरे यांनी स्वत:च्या मुलाला कशी उमेदवारी दिली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात ७0 ते ८0 तिकिटे चुकीच्या पद्धतीने कशाच्या मोबदल्यात वाटली, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही चौधरी यांनी पक्षाकडे केली आहे.
बिहार आणि राजस्थानमध्ये तिकीट वाटपात वासनिक यांनी घोळ केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या अधिवेशनात झाला होता. त्याचे स्मरण करून देत चौधरी यांनी, वासनिक यांचे हस्तक अकोला व राज्यात सर्वत्र फिरून तिकीट वाटपाचे काम करतात, असा आरोप केला. बुलडाण्यात नोकरीनिमित्त गेलेल्या अकोल्यातील एका व्यक्तीला जिल्हाध्यक्षपद देऊन, ६ ते ७ वर्षांपासून स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू आहे. हीच व्यक्ती अकोल्यात येऊन तिकीट वाटप करून जाते, असा आरोपही चौधरी यांनी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांचे नाव न घेता केला. काँग्रेसने आठ वेळा तिकीट देऊन पाच वेळा पराभूत झालेले वासनिक एकदा निवडून आले, की त्याच मतदारसंघातून पुन्हा निवडून येत नाहीत आणि अशा व्यक्तीकडे राज्याचे नेतृत्व देण्यात आले आहे. विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी यांना वगळून विदर्भावर एक प्रकारे अन्यायच केला आहे. हा अन्याय दूर करण्याची मागणी चौधरी यांनी केली. चौधरी यांच्या या आरोपांबाबत माणिकराव ठाकरे आणि मुकुल वासनिक यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही, तर वासनिक यांचा भ्रमणध्वनी प्रतिसाद देत नव्हता.