नगरप्रदक्षिणा मार्गावर चिखलाने राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 01:12 IST2016-08-03T01:12:42+5:302016-08-03T01:12:42+5:30
रस्ता ओलांडण्यासाठी बांधलेल्या, इंद्रायणी नदीवरील पुलाच्या पूर्व किनाऱ्यावरील भुयारी पादचारी मार्ग आणि पादचारी पुलांचा वापर होत नाही.

नगरप्रदक्षिणा मार्गावर चिखलाने राडा
आळंदी : रस्ता ओलांडण्यासाठी बांधलेल्या, इंद्रायणी नदीवरील पुलाच्या पूर्व किनाऱ्यावरील भुयारी पादचारी मार्ग आणि पादचारी पुलांचा वापर होत नाही. त्यामुळे त्यावरील लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.
या मार्गांचा वापर अधिक प्रमाणात केल्यास वाहतूक समस्येचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. येथील नगरप्रदक्षिणा मार्गावर चिखलाचे साम्राज्य आणि खड्डे वाढल्याने नागरिकांची नाराजी वाढत आहे. येथील रस्ते विकासकामाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक-भाविक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील चिखलाच्या आणि खड्ड्यांच्या साम्राज्याने रस्तेविकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील भुयारी पादचारी मार्ग आणि भागीरथी नाला, मनकर्णिका नाला पादचारी आणि रस्ते वाहतूक होणाऱ्या पुलांच्या सद्य:स्थितीबाबत आळंदी जनहित फाउंडेशनने सर्वेक्षण केले. त्यात भागीरथी नाला पादचारी पूल मार्गाचा वापर नागरिकांकडून केला जातो. तर, मनकर्णिका नाला बंदिस्त होण्याचे प्रतीक्षेत आहे.
हॉकरना परवानगी दिल्याने पादचाऱ्यांची चावडी हजेरी मारुती मंदिरालगत वर्दळ वाढली आहे, याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
> रस्ता विकसित करा
इंद्रायणी नदीच्या दुतर्फा असलेल्या पुलालगत पादचारी भुयारी मार्ग पूर्व किनाऱ्यालगत बंद आहे. तो आळंदी पालिकेने पादचाऱ्यांसाठी तसेच पूर्व किनाऱ्याची रस्त्यावरील दुरवस्था दूर करावी, अशी मागणी होत आहे. थेट माऊली बागेत जाण्यासाठी किनारा रस्ता सोयीस्कर असल्याने तत्काळ विकसित करावा, अशी मागणी होत आहे.